बेळगाव लाईव्ह :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एफएसटी पथकाने बेळगाव विमानतळ येथे एका प्रवाशाकडून 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
सदर रक्कम ज्या प्रवाशाकडे आढळली त्याचे नांव जसबीर सिंग असे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी होणारी भेटवस्तू रोकड आदींसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी रस्ते व हवाई वाहतूक मार्गावर कडक नजर ठेवली जात आहे.
त्या अनुषंगाने सांबरा येथील बेळगाव विमानतळावर आज एका प्रवाशाकडून 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या अर्थात तहसीलदारांच्या सूचनेवरून एफएसटी मारीहाळ टीम बीचे अधिकारी शशिकांत कोळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
त्यांनी विमानतळावर दाखल झालेल्या जसबीर सिंग या प्रवाशाची आणि त्याच्या बॅगेची तपासणी केली असता बॅगेमध्ये 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम आढळून आली.
एफएसटी पथकाने ती रक्कम ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तहसीलदारांनी विमानतळावर 2 लाख रुपयांची रक्कम आणली जात असल्याचे सांगितल्यानंतर आम्ही ही कारवाई केली, अशी माहिती एफएसटी अधिकारी शशिकांत कोळेकर यांनी बेळगाव लाईव्हला दिली.