बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्ह्यातील निवडक वस्त्यांना जलजीवन अभियानांतर्गत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे एकूण 377 कोटी रुपये खर्चाचे दोन प्रकल्प राबविण्यास कर्नाटक मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
कर्नाटक मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सदरची माहिती कायदामंत्री एच. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यामधील दड्डी व इतर 81 गावे (21 वस्त्या) आणि बेळगाव तालुक्यातील एक गाव (एक वस्ती) यांना डीबीओटी तत्त्वावर 285 कोटी रुपये खर्चाचा बहुग्राम पेयजल प्रकल्प राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे हुक्केरी तालुक्यातीलच पाच्छापूर व इतर 18 गावे (28 वस्त्या) आणि कुंदर्गी तसेच इतर 21 गावे (26 वस्त्या) यांच्यासाठी 92 कोटी रुपये खर्चून बहुग्रामीण पेयजल प्रकल्प डीबीओटी तत्त्वावर राबवण्यास मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.