Saturday, January 11, 2025

/

रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डतर्फे सुनील आपटेकर सन्मानित

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शरीर सौष्ठवक्षेत्रासह रेल्वे खात्यामध्ये भरीव योगदान देत असल्याबद्दल भारतीय रेल्वेचे शरीरसौष्ठव प्रशिक्षक, एकेकाळचे नामांकित आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू एकलव्य पुरस्कार विजेते बेळगावचे सुपुत्र मि. इंडिया, मि. एशिया सुनील आपटेकर यांचा रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड आणि सर्व रेल्वे विभागांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.

हुबळी येथे नुकत्याच पार पडलेल्या रेल्वे खात्याच्या आंतर विभागीय शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेचे औचित्य साधून सुनील आपटेकर यांच्या सत्काराचे खास आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांच्या हस्ते मराठमोळी पगडी आणि शाल घालून तसेच शौर्याचे प्रतीक असलेली तलवार देऊन सुनील आपटेकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराद्वारे आपटेकर यांच्या आजवरच्या आदर्शवत कार्याला भारतीय रेल्वेने सलाम केला.

सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त करताना सुनील आपटेकर म्हणाले की आज या सत्कार प्रसंगी मला मी भारतीय रेल्वेच्या सेवेत दाखल झालेला पहिला दिवस आठवतो. चांगला शरीर सौष्ठवपटू असलो तरी मला त्याकाळी चांगल्या नोकरीची गरज होती. तेंव्हा रेल्वे क्रीडापटूंना मोठे प्रोत्साहन देते हे कळाले आणि रेल्वेच्या तत्कालीन शरीर सौष्ठव प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मी रेल्वे खात्यात दाखल झालो.Aptekar

त्यानंतर खऱ्या अर्थाने या खात्याने मला घडवले. तसेच भविष्यात रेल्वे खात्याचा नावलौकिक वाढवा यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न असतील असे आपटेकर यांनी सांगितले. याप्रसंगी नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह वरिष्ठ रेल्वे अधिकारी, रेल्वेच्या सर्व विभागाचे शरीरसौष्ठवपटू, निमंत्रित आणि क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या कारकिर्दीत सुनील आपटेकर यांनी एक मातब्बर क्रीडापटू म्हणून जी असामान्य कामगिरी केली आहे ती समस्त बेळगावकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. प्रतिष्ठेचा एकलव्य पुरस्कार मिळवणारे बेळगावचे पहिले क्रीडापटू होण्याचा सन्मान मिळवत आपटेकर यांनी बेळगावच्या क्रीडा क्षेत्राचा फक्त दर्जाच उंचावला नाही तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात होतकरू शरीर सौष्ठवपटूंना शिस्तीचे धडे देत योग्य मार्गदर्शन करून नावारूपासही आणले आहे. त्यांच्या एकंदर कार्याची दखल घेत हुबळी येथे रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने केलेल्या सत्काराबद्दल सुनील आपटेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.