Sunday, September 15, 2024

/

शिवाजी नगरमधील जागृत होळी कामण्णा देवस्थान

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावला जसा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे, त्याचप्रमाणे धार्मिकतेचा वारसाही लाभला आहे. बेळगाव शहराच्या, तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पुरातन काळासह विविध राजवटींच्या कालावधीतील देवस्थाने आजही अबाधित आहेत. अनेक जागृत देवस्थानांचा वारसा लाभलेल्या बेळगावमधील छ्त्रपती शिवाजी नगर येथे देखील असेच एक जागृत देवस्थान आहे, ते म्हणजेच सन १९५० पासून या भागात असलेले श्री होळी कामण्णा देवस्थान.

सुमारे ७५ वर्षांपासून भाविकांचे अढळ श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या  छ्त्रपती शिवाजी नगर, पाचवी गल्ली येथील श्री होळी कामण्णा देवस्थानाचा सध्या जीर्णोद्धार करण्यात येत आहे. मात्र हे देवस्थान १९५० सालापासून याठिकाणी उभं आहे. इटगी सावकार हे या देवस्थानाच्या जागेचे मूळ मालक. तत्कालीन पंच मारुतीराव मंडोळकर यांना सदर जागा हि पंचमंडळींच्या नावे करून घेण्याची सूचना इटगी सावकारांनी केली.

मात्र काही कारणास्तव हे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर १९७७ साली सिटी सर्व्हे अस्तित्वात आला. आणि या दरम्यान या जागेचा काही भाग सेठ बंधूंच्या नावे नोंद केला गेला. या जागेसंदर्भात पुंडलिक मंडोळकरांच्या अध्यक्षतेखाली सन १९९६ मध्ये याचिका दाखल करण्यात आली. सेठ बंधू यांच्याशी समन्वय साधून, मध्यस्थी करून सदर जागेचा वादातीत भाग हा पुन्हा देवस्थानाच्या नावे करून घेण्यात आला. साधारण १३.५ X ३५ चौरस फूट आकाराची हि जागा देवस्थान साठी घेण्यात आली.

जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले शिवाजी नगर मधील या देवस्थानाचा जीर्णोद्धार हाती घेण्यात आला. प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या अध्यक्षतेखाली या देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्यात येत असून मागील बाजूस हॉल आणि समोरील बाजूस देवस्थान अशा स्वरूपात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. जीर्णोद्धार, कळसारोहण आणि वास्तुशांती याचबरोबर भाविकांसाठी महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम शिवाजीराव मंडोळकर आणि गल्लीतील पंच मंडळींनी आखला आहे.

या देवस्थानासाठी कार्य करणारी मंडोळकर कुटुंबाची हि तिसरी पिढी असून मारुती मंडोळकर, पुंडलिक मंडोळकर आणि सध्या शिवाजी मंडोळकर अशा तिसऱ्या पिढीने मंदिराचा वारसा जोपासत देवस्थानाची भक्कम अशी वास्तू उभारली आहे.Kamanna

या देवस्थानाचा वास्तुशांती आणि कळसारोहण समारंभ १९ आणि २० फेब्रुवारी रोजी आयोजिण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शिवप्रतिष्ठापन हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत वास्तुशांती कार्यक्रम आयोजिण्यात आला असून सायंकाळी ४.०० वाजता मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मिरवणुकीत गल्लीतील महिलांनी कलश घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याचप्रमाणे २१ फेब्रुवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळा आयोजिण्यात आला आहे.Shivaji mandolkar

सकाळी ७ ते ११.३० या वेळेत विधिपूर्वक सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन होळी कामण्णा मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष, नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर आणि गल्लीतील समस्त पंचमंडळींनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.