बेळगाव लाईव्ह:मुंबईतील अनिल जैन यांनी शांताई वृद्धाश्रमातील आजा आजींसाठी ‘मुंबई दर्शन’ उपक्रम पुरस्कृत केला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी आम्ही ‘शांताई’तील आजा -आजींना येत्या गुरुवार दि. 22 फेब्रुवारी रोजी हवाई सफर घडवत विमानाने मुंबईला घेऊन जाणार आहोत, अशी माहिती शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष व माजी महापौर विजय मोरे यांनी दिली.
शहरामध्ये आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते माजी महापौर सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे म्हणाले की, शांताई वृद्धाश्रमाच्या माध्यमातून शहरात एक आगळा उपक्रम राबवण्याचा विचार आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करत होतो. यापूर्वी शांताई वृद्धाश्रमातल्या सर्व ज्येष्ठ नागरिक आजा-आजींना आम्ही बस व रेल्वेने सहलीला नेले आहे. समुद्रात बोटीची सफर देखील घडविले आहे मात्र आतापर्यंत त्यांना विमानाची सफर घडविली नव्हती. हा योग जुळून यावा यासाठी आम्ही गेल्या 4-5 वर्षांपासून प्रयत्न करत होतो. मात्र अलीकडे मुंबईतील आमचे मित्र अनिल जैन हे लग्न समारंभाच्या निमित्ताने बेळगावला आले असता त्यांनी शांताई वृद्धाश्रमाला भेट दिली. त्यावेळी सुमारे 3-4 तास ते आश्रमातील आजा -आजींच्या सहवासात रमले.
त्यांच्याशी त्यांनी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांना माया, आपुलकी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा समजल्या. तेंव्हा त्यांनी आश्रमातील सर्व आजा -आजींना मुंबई दर्शन घडविण्याची इच्छा माझ्यासमोर प्रकट केली. तसेच त्यांचा प्रवासासह राहण्याखाण्याचा सर्व खर्च स्वतः करू असे देखील सांगितले. विशेष म्हणजे सर्वांना विमानाने मुंबईला घेऊन या असे ते म्हणाले. या पद्धतीने आश्रमातील सदस्यांसाठी आम्ही वाट पाहत असलेला विमान सफरीचा योग आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी आश्रमातील सर्व आजा -आजींसह कर्मचारी आणि संचालक असे एकूण 42 जण विमानाने सांबरा विमानतळावरून मुंबईला रवाना होणार आहोत.
सदर योग जुळवण्यात स्टार एअरलाइन्सचे संजय घोडावत, निलेश बागी आदींचे आम्हाला मोठे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे पत्रकार आणि देणगीदारांच्या सहकार्यातून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. मुंबई येथे आमचा पाच दिवसांचा मुक्काम असणार आहे. मुंबई दर्शनादरम्यान आम्ही आजा -आजींसोबत गेट वे ऑफ इंडिया, जॉय फाउंटन, चौपाटी, श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, अटल सेतू अशा विविध धार्मिक व प्रेक्षणीय ठिकाणी भेट देणार आहोत.
मुंबई दर्शनचे नियोजन केल्याबद्दल मी शांताई वृद्धाश्रमाचा कार्याध्यक्ष व माजी महापौर या नात्याने अनिल जैन व समस्त कुटुंबीयांचा शतशः आभारी आहे. सामाजिक कार्यांतर्गत हवाई सफर घडवण्याचा बहुदा हा बेळगावातील पहिलाच उपक्रम आहे असे सांगून भविष्यात आश्रमातील आजा -आजींना काशी, अयोध्या वगैरे ठिकाणी घेऊन जाण्याचा आपला मानस असल्याचे विजय मोरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस दिलीप कुरुंदवाडे, ॲलन मोरे आदींसह शांताई वृद्धाश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते.