Thursday, December 26, 2024

/

जिल्हा रुग्णालयात पुन्हा सर्व्हर डाऊन; नागरिकांचा संताप

 belgaum

बेळगाव लाईव्ह: : जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा रुग्णालयात नेहमीच विविध कारणांमुळे रुग्णांना असुविधा निर्माण होत आहे.

जिल्हा रुग्णालयात सर्व्हर डाऊनची समस्या हि नेहमीचीच आहे. मात्र सोमवारपासून पुन्हा सर्व्हर डाऊन झाल्याने ओपीडी नोंदणी केंद्रासमोर नागरिकांना तासन्तास ताटकळत उभे राहण्याची वेळ आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

उपचारासाठी रुग्णाला घेऊन आलेल्या नागरिकांची सर्व्हर डाऊनमुळे मोठी तारांबळ उडाली. यामुळे हॉस्पिटल कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादी झाली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.

रुग्णांना उपचार घेण्यापूर्वी ओपीडी नोंदणी केंद्रावर नावनोंदणी करून पावती घ्यावी लागते. त्यानंतर पुढील उपचाराला सुरुवात केली जाते. यासाठी नागरिक सकाळपासूनच सदर केंद्रावर गर्दी करतात.

सोमवारचा दिवस असल्याने उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाले होते. अनेक नातेवाईकांनी नोंदणीसाठी रांगा लावल्या होत्या. मात्र सर्व्हरडाऊन झाल्याने नोंदणी करणे अशक्य झाले. त्यामुळे बराचकाळ नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागले.

बाहेर गावांहून आलेल्या रुग्णांचे व नातेवाईकांचे हाल झाले. नोंदणीअभावी रुग्णांवर उपचार करणे अशक्य होते. त्यामुळे अनेक रुग्णांना तासनतास बाहेरच ताटकळत बसावे लागण्याची वेळ आली. नागरिकांनी चार तास रांगेत थांबूनही नोंदणी होत नसल्याची तक्रार केली. रुग्णाला उपचारासाठी आणण्यात आले. मात्र नावनोंदणी होत नसल्याने उपचार देणे अशक्य झाले आहे. याबद्दल संबंधित नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे रुग्णालयात रुग्णांची व नातेवाईकांची तोबा गर्दी झाली होती.

दुपारनंतर सर्व्हरडाऊनची समस्या दूर करून सेवा पूर्ववत सुरू केली. यासंदर्भात माहिती देताना बीम्सचे संचालक अशोक शेट्टी यांनी, सर्व्हरडाऊनची समस्या स्थानिक नाही तर बेंगळूरहूनच निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली. मात्र ही समस्या निवारण करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.