बेळगाव लाईव्ह:दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते .शाळेचे प्रेरणास्थान असलेले,थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे उध्दारकर्ते ,क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांचे सामाजिक ,शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी नेहमी शाळेमध्ये विविध कार्यक्रम/ उपक्रम आयोजित केले जातात. महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, महात्मा फुले व्याख्यानमाला , सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजना , एवढेच नाही तर काही वर्षांपूर्वी अतुल पेठे दिग्दर्शित ‘ सत्यशोधक’ या नाटकाचेही यशस्वी आयोजन शाळेने केले होते त्या नाटकालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
यावर्षी महाराष्ट्रात 5 जानेवारी रोजी सत्यशोधक हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ‘ सत्यशोधक’ हा सिनेमा समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे.
चित्रपटात महात्मा फुले यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचे अतिशय बारकाईने चित्रण केले आहे. शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध, मुलींची पहिली शाळा, सावित्रीबाई फुले यांच्या वरील शेण, दगड – गोटयाचा मारा, महात्मा फुले यांच्या वर झालेला खुनी हल्ला , गोर गरीब, अस्पृश्य लोकांसाठी पाण्याचा हौद खुला केला , सत्यशोधक समाजाची स्थापना अश्या अनेक प्रसंगांमधून महात्मा फुले यांचे कार्य हुबेहूब उभे करण्यात आले आहे.
सर्वांनी हा चित्रपट नक्की पहावा असा आहे. ‘सत्यशोधक’ या सिनेमातून महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारक विचारांचा जागर करण्यात आला असून..मराठी विद्यानिकेतन शाळा ही या विचारांने कार्यरत आहे.. हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला होता पण बेळगाव मध्ये हा प्रदर्शित करण्यात आला नव्हता.. हा सिनेमा विद्यार्थ्यांनी दाखविणे आवश्यक होते यासाठी शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व शाळा प्रशासनाचे नीला आपटे,नारायण उडकेकर, गजानन सावंत, गौरी ओऊळकर यांनी ग्लोब थिएटर च्या व्यवस्थापनाशी चर्चा केली.
व काही शो मुलांच्या साठी उपलब्ध करून घेण्यात आले.. यातील पहिला शो आज संपन्न झाला.. चित्रपट सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी चित्रपट गृहामध्ये महात्मा फुलेंचे अखंड गाईले.. यानंतर चित्रपट पाहण्यात आला.. एकंदरीत चित्रपटातून विद्यार्थ्यांना महात्मा फुलेंच्या परिवर्तनवादी कार्याची अनुभुती मिळाली .अनेक विद्यार्थी भारावून गेले होते. या पहिल्या शो साठी जेष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यार्थी ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.