Wednesday, December 25, 2024

/

फोन इन’ अंतर्गत ऑनलाइन लुबाडणुकीच्या अनेक तक्रारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या तक्रारी जाणून घेण्यासाठी आज मंगळवारी आयोजित जिल्हा पोलीस प्रमुखांचा ‘फोन इन’ कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

बहुसंख्य नागरिक ऑनलाईन आर्थिक फसवणुकीला बळी पडत असून या महिन्यात ऑनलाइन व्यापार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तिघा जणांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनी आज दिली.

बहुसंख्य नागरिक विनाकारण फसवणुकीमुळे आपले पैसे गमावत आहेत याच महिन्यात आमच्याकडे तशी तीन प्रकरण आली आहेत. चिक्कोडी, गोकाक आणि निपाणी येथे घडलेल्या या तीन प्रकरणात संबंधित व्यक्तींना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

यापैकी एका प्रकरणात 22 लाख रुपये अन्य दोन प्रकरणात ऐवतयंट लक्ष आणि इप्पत मूर लक्ष रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेले तिघेही जण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात यापैकी एक जण एरोनॉटिकल इंजिनियर तर दुसरा प्रोफेसर असून दोघांनीही एकमताने 22 लाख रुपये गुंतवले होते.

फसवणूक झालेली दुसरी व्यक्ती व्यावसायिक असून चांगली सुशिक्षित आहे. तिसरी व्यक्ती दोन-तीन वाईन शॉप्सची मालक आणि डबल ग्रॅज्युएट आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे की अशी सुशिक्षित लोक सोशल मीडियावरील फसवणुकीला बळी पडत आहेत असे सांगून सोशल मीडियावरील फेसबुक टेलीग्राम इंस्टाग्राम किंवा व्हाट्सअप या माध्यमांद्वारे ऑनलाइन व्यापाराच्या जाहिरातींच्या माध्यमातून कशी फसवणूक केली जाते याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली.

फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन व्यापाराच्या जाहिरातील योजनेला भुलून एखाद्या व्यक्तीने प्रथम 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दोन-तीन दिवसात त्याच्या मोबाईलवर तुम्हाला इतका इतका नफा झाला आहे असा संदेश मिळतो. साहजिकच नफा मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे अशी विचारणा ती व्यक्ती योजनेच्या ग्रुपवर करते. तेंव्हा तिला तुमचे सर्व पैसे विड्रा करा असा सल्ला दिला जातो. त्यानुसार नफ्यासह 1 लाख रुपये काढल्यानंतर अवघ्या तीन दिवसात गुंतवलेल्या एक लाखावर आपल्याला चक्क 50 टक्के नफा मिळाल्याने ती व्यक्ती हरखून जाते.

त्यानंतर ती व्यक्ती आपले, आपल्या पत्नीचे आणि मित्रमंडळींचे पैसे अशी एकूण अरवत्त लक्ष त्या योजनेमध्ये गुंतवते. तेंव्हा देखील दोन-तीन दिवसात त्याला नफ्याचा संदेश मिळतो. मात्र त्यामध्ये यावेळी तुम्हाला कमी म्हणजे 8 लाख रुपये नफा झाला असल्याचे नमूद असते. तसेच ते पैसे विड्रॉ करण्याची सूचनाही केली जाते. त्यानुसार ती व्यक्ती पैसे काढण्यास जाते. मात्र पैसे विड्रा न झाल्यामुळे ती व्यक्ती पुन्हा आपल्या ग्रुप वर विचारणा करते.

त्यावेळी रक्कम मोठी असल्यामुळे तुम्हाला आगाऊ आयकर भरावा लागेल असे सांगितले जाते. तेंव्हा ती व्यक्ती पुन्हा 5 लाख रुपये जमा करते. या पद्धतीने सदर व्यक्ती एकूण एप्पतमुर लक्ष रुपये जमा करते. इतके सर्व करूनही त्यानंतर जेंव्हा पैसे मिळत नाहीत आणि योजनेतील कोणाकडून प्रतिसादही मिळत नाही त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात येते. याच पद्धतीने एकाची टेलिग्राम ग्रुपवर तर अन्य एकाची इंस्टाग्राम ग्रुपवर फसवणूक झाली आहे. लक्षात घ्या की इंस्टाग्राम आणि फेसबुक ही एकच कंपनी आहे. थोडक्यात ऑनलाइन व्यापाराच्या जाहिराती फेसबुकच्या इंस्टाग्रामवर आणि इंस्टाग्रामच्या फेसबुकवर प्रसिद्ध होत असतात. टेलिग्रामचे चॅनल वेगवेगळे असतात. त्यामुळे ऑनलाइन व्यापारासाठी क्लिक केल्यास ते टेलिग्रामवर देखील जाते. सर्वांची कार्यपद्धती एकच असते. योजनेत सामील होणारा कोणत्या ना कोणत्या ग्रुपला जोडला जात असतो. त्या ग्रुपमध्ये पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेले फसवणूक करणाऱ्या टोळीचे सदस्य नव्याने दाखल झालेल्या सदस्याला आम्हाला अमुक इतका फायदा झाला असे सांगून पैसे गुंतवण्यास फशी पाडतात. त्यानंतर तो सदस्य सुरुवातीला 25 -30 हजार रुपयांची गुंतवणूक करतो. पुढे त्याला नफ्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांना लुबाडले जाते, असे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी स्पष्ट केले.

‘फोन इन’ कार्यक्रमात बेळगाव, चिक्कोडी, निपाणी, गोकाकसह जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी फोनद्वारे आपल्या तक्रारी आणि पोलीस खात्याशी संबंधित समस्या पोलीस प्रमुखांसमोर मांडल्या. सर्वांकडून आस्था पूर्वक माहिती जाणून घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संबंधित अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.