बेळगाव लाईव्ह :’बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) भाजी मार्केटमधील व्यापारासाठी सहकार्य करण्याची सूचना कृषी उत्पन्न खात्याच्या उपसंचालकांनी एका नोटीसद्वारे जय किसान होलसेल भाजी मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षांना केली आहे.
शहरात जय किसान होलसेल भाजी मार्केट सुरू झाल्यापासून त्याचा प्रतिकूल परिणाम सरकारच्या एपीएमसी भाजी मार्केटवर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावरून मोठा वादही झाला होता. या संदर्भात गेल्या महिन्याच्या एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली होती.
सदर बैठकीत एपीएमसी भाजी मार्केट आणि जय किसान होलसेल भाजी मार्केट या दोन्ही मार्केटमधील व्यापार समन्वयाने सुरळीत या दृष्टिकोनातून सर्वांगाने चर्चा झाली होती. तसेच बहुतांश व्यापार जय किसान भाजी मार्केटच्या ठिकाणीच केंद्रित होत असल्यामुळे तेथील 50 टक्के व्यापार एपीएमसी भाजी मार्केटकडे वळविण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला होता.
मात्र आता महिना झाला तरी ठरल्याप्रमाणे 50 टक्के व्यापार एपीएमसी मार्केटकडे वळविण्यात आलेला नाही. तरी बैठकीत घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना कृषी उत्पन्न खात्याच्या उपसंचालकांनी एका नोटीसद्वारे जय किसान होलसेल भाजी मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षांना केली आहे.