बेळगाव लाईव्ह :वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत जास्त विचार न करता रेल्वे खात्याने बेळगाव ते पुणे दरम्यान प्रथम इंटरसिटी रेल्वे सेवा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मध्य रेल्वेने यापूर्वीच गेल्या महिन्यात इंटरसिटी रेल्वे सेवेचे वेळापत्रक तयार केले आहे. मात्र वंदे भारत एक्सप्रेसच्या मागणीमुळे त्या वेळापत्रकाची अंमलबजावणी तात्पुरती रोखण्यात आली आहे.
पुणे आणि बेळगाव या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान थेट अशी कार्यक्षम रेल्वे सेवा असावी अशी गेल्या सुमारे अर्ध दशकापासून मागणी होत आहे. त्या अनुषंगाने आता सर्व ती सिद्धता झाली असताना देखील बेळगाव पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यास विलंब केला जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पुणे विभागाच्या रेल्वे सूत्रांकडून देखील इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी सर्व ती तयारी करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर रेल्वे सेवा सुरू झाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार असून विशेष करून सांगली आणि मिरज मार्गे करावा लागणारा प्रवास टळणार आहे.
रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांनी देखील बेळगाव ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेचे रेल्वे समुदायांमधील महत्त्व अधोरेखित करताना ती सुरू व्हावी यासाठी पुढाकार घेतला होता.
आता आगामी लोकसभा निवडणूक राजकीय वातावरण तापत आहे. तेंव्हा अत्यंत आवश्यक असलेली ही रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी हा योग्य क्षण असल्याचा युक्तिवाद इंटरसिटी रेल्वे सेवेच्या समर्थकांकडून केला जात आहे.