बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारकडून मिळालेल्या २० कोटींच्या अनुदानातून बेळगावमध्ये १०० खाटांची क्षमता असणारे माता – बाल रुग्णालय उभारण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात अलीकडे सर्वसुविधांनीयुक्त असा प्रसूतिविभाग उभारण्यात आला असून प्रसुती विभागात येणाऱ्या गर्भवती महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे रुग्णालयात जागेचा अभाव निर्माण होत असल्याने माता-बाल रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर रुग्णालय डिसेंबरपर्यंत नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यास बिम्स प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती बिम्स संचालक अशोककुमार शेट्टी यांनी दिली आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये सरकारकडून अनेक सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच प्रसुती विभागात स्वच्छतेबरोबर गर्भवती महिलांची व नवजात बालकांची अधिक दक्षता घेतली जात आहे. तसेच सरकारच्या योजनांचा लाभ करून दिला जात आहे. त्यामुळे प्रसुती विभागात येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या अधिक झाली आहे. जागेचा अभाव निर्माण होत असल्याने केंद्र सरकारच्या सहयोगाने माता आणि बाळ रुग्णालय उभारण्यात येत आहे. सदर रुग्णालयाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी बिम्स प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
सध्या प्रसुती विभागात २०० खाट उपलब्ध आहेत. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जागेची कमतरता पडत आहे. बिम्सतर्फे सरकारला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार केंद्र सरकारच्या मदतीतून माता आणि बाळ रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. इमारतीचे काम गतीने सुरू आहे. कंत्राटदाराने येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार प्रयत्न केले जात आहेत. या रुग्णालयामुळे गोरगरीब नागरिकांना आणखी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.