बेळगाव लाईव्ह :प्रेमाचे आलिंगन देऊन समाजाला स्मृतिभ्रंश करण्याचे कारस्थान ओळखून लेखकाने समाजाला जागे करायला हवे. सामान्यांचा क्षीण आवाज लक्षात घेऊन त्याने या सामान्यांचा आवाज होऊन त्याना जागे करायला हवे, असे मत महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व विचारवंत कृष्णात खोत यांनी व्यक्त केले
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (अ.भा.म.सा.प.) व मराठा मंदिर बेळगाव यांच्यातर्फे आयोजीत 5 व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील छ. शिवाजी महाराज संमेलन नगरी (मराठा मंदिर) येथे आज रविवारी हे मराठी साहित्य संमेलन साहित्यप्रेमींच्या उदंड प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कृष्णात खोत यांनी आज-काल मीच मला चांगले म्हणायचे. मीच माझा फोटो काढायचा, मीच माझे निबंध लेखन प्रसिद्ध करायचे, मीच मला पुरस्कार मिळाला की तोही जाहीर करायचा. असा काळ असताना तुम्ही सगळे एकत्र येऊन कार्य करत आहात हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगत संमेलन आयोजकांचे कौतुक केले. जगण्याचे साहित्य लिहायला हवे. मी माझ्या भाषेतून व्यक्त होतो याचा मला अभिमानच आहे. मी कोणत्याही प्रांतात राहत असलो तरी माझी मातृभाषा ही मला श्रेष्ठ आहे. भाषेची गळचेपी करणे म्हणजे हिटलरशाही होय. त्या विरोधातच छ. शिवाजी महाराजांनी काम केले आणि लेखकाने देखील तेच करणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले. अन्न -वस्त्र -निवारा या मूलभूत गरजांवर आपली चौथी गरज ही राजकारण झाली आहे आणि समाज झुंडीमध्ये बदलत आहे. ही झुंड समाजाच्या सद्वर्तनालाच नख लावणारी ठरेल आणि लेखक म्हणून मला त्याची काळजी वाटायला हवी, असे नमूद करून सातत्याने प्रेमाचा वर्षाव करून समाजाचा स्मृतिभ्रंश करण्याचे कारस्थान आज दिसून येत आहे. त्या विरोधात लेखकाने भूमिका घ्यायला हवी आणि सामान्यांच्या बाजूने सत्याच्या बाजूने उभे राहत निरीक्षणे नोंदवत राहिली पाहिजेत. साहित्यात ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव नको, असे विचार खोत यानी मांडले.
माझी भाषा युनिव्हर्सल आहे. मी माणसाच साहित्य लिहितो माणसाच्या जगण्याचं साहित्य लिहितो. पर्यावरणाचे साहित्य लिहितो. माझ्या भाषेतून व्यक्त होतो. माझ्या भाषेत मला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य स्वतंत्र भारतात अबाधीत आहे. मी कोणत्याही प्रांतात राहत असलो तरी माझी मातृभाषा मला कोणत्याही प्रांता पेक्षा श्रेष्ठ आहे. मी जर माझ्या प्रांतात राहून दुसरी भाषा बोलत असलो तरीही तिचा मला गौरव असला पाहिजे. भाषा भगिनींचा असणारा गौरव आपल्या मूल्य संस्कृतीमध्ये आहे. कोणत्याही भाषेची गरज म्हणजे लोकशाहीला विरोध करून हुकूमशाही करणारी नसावी. हिटलरशाही कोणात्याही भाषेत असू नये. कोणत्याही लेखकाला हिटलरची भाषा आवडत नाही. तो लोकशाहीची भाषा बोलतो, तो गांधीवादी बोलतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा बोलतो. कारण छ. शिवाजी महाराजांनी सगळ्या हुकूमशाहीच्या विरोधात काम केलं. शांततेचा आवाज जो लेखक पकडतो, तो आंधळ्या अंधारात प्रकाश शोधत जातो. त्याच्यात प्रकाश शोधायची ताकद असते. आपण लोकांना सातत्याने कार्यक्रम द्यायला पाहिजे. बेळगावच्या परिसरामध्ये खेड्यापाड्यात इतक्या उत्साहाने संमेलन भरतात त्यातूनच लेखक घडत असतो. त्यातूनच साहित्य घडत असते, त्यातूनच एखादा लिहिणारा सापडत असतो. त्यातून एखादा हुंकार बाहेर येतो, त्यातूनच एखादी कळी फुलत असते. त्यामुळे तुमच्या साहित्य संमेलनाला आणि परिसरातील सर्व संमेलनांना मी धन्यवाद देतो. कारण अखिल भारतीय संमेलनाला देखील लाजवतील अशा पद्धतीची संमेलन तुम्ही भरवता. ही गोष्ट माझ्यासारख्या मनुष्य हा सामाजिक किंबहुना कौटुंबिक नाती जपण्यास समर्थ ठरते आहे. वाचन तुम्हाला गोंगाटात देखील शांतता मिळवून देतं. वाचन तुम्हाला लढायला शिकवते लढलेल्या माणसांची कहाणी वाचन देते. आपल्यासारख्या सामान्य माणसं कशी लढत होती हे तुम्हाला पुस्तक शिकवतात. एका आयुष्यामध्ये आपण अनेक आयुष्य जगू शकत नाही. मात्र पुस्तक तुम्हाला अनेक आयुष्याचा सार देते म्हणून आपण पुस्तक वाचायला पाहिजे. लेखन हा जसा स्वतःशी संवाद आहे तसाच वाचनही स्वतःशी केलेला संवाद असतो. तो तुम्हाला जगातल्या गोंगाटापासून नेहमी दूर ठेवत असतो, असे अध्यक्ष कृष्णात खोत यांनी सांगितले.
संमेलनाची सुरुवात सकाळी संत श्री बसवेश्वर सर्कल (गोवावेस) येथून संमेलन स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या सवाद्य ग्रंथदिंडीने झाली. ग्रंथदिंडीचे पूजन आणि उद्घाटन माजी नगरसेवक पंढरी परत व सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी विलास नारायण घाडी यांच्या हस्ते झाले. दिंडीच्या अग्रभागी संमेलनाध्यक्ष कृष्णात खोत, उद्घाटक आप्पासाहेब गुरव, शिवसंत संजयजी मोरे, अनिल पवार, डॉ. गणेश राऊत रवींद्र पाटील आदींसह साहित्यिक, कवी व साहित्यप्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले होते. ग्रंथ दिंडीची सांगता झाल्यानंतर नगरसेवक शिवाजी पुंडलिक मंडोळकर यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज संमेलननगरीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे उद्योजक रमेश पाटील, व्यापारी सुरेश रेडेकर आणि सरकारी कंत्राटदार शिवाजी अतिवाडकर यांच्या हस्ते अनुक्रमे ग्रंथ दालन, ज्येष्ठ दिग्दर्शक कै. नितीन देसाई सभागृह व पॉलिहाइड्रॉन व्यासपीठ यांचे उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, मराठा मंदिरचे सचिव बाळासाहेब काकतकर, नागेश रामराज्य रोडलाईन्सचे मनोहर मुचंडी, बेळगुंदीचे डॉ. नितीन राजगोळकर, वसुंधरा को-ऑप. सोसायटीचे चेअरमन वाय. बी. चव्हाण, निवृत्त नौदल जवान ए. के. पाटील, येळ्ळूर ग्रा.पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील आणि क्रेडाईचे सचिव युवराज हुलजी यांच्या हस्ते अनुक्रमे छ. शिवाजी महाराज मूर्ती, संत ज्ञानेश्वर प्रतिमा, संत तुकाराम महाराज प्रतिमा, राजमाता जिजाऊ प्रतिमा, ध. संभाजी महाराज प्रतिमा, शाहू महाराज प्रतिमा, स्वामी विवेकानंद प्रतिमा, सावित्रीबाई फुले प्रतिमा व कुसुमाग्रज प्रतिमा पूजन कार्यक्रम झाला.
संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे उद्योजक आप्पासाहेब गुरव व व्यासपीठावरील अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. स्वागताध्यक्ष यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले. अ.भा.म.सा. परिषद बेळगावचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केल्यानंतर संमेलनाध्यक्ष कृष्णात खोत व अ.भा.म.सा.प. बेळगावचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते “शिवराज्याभिषेक” भारताच्या इतिहासातील असामान्य घटना.. या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे गीतकार सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या “अखंड महाराष्ट्राचा लढा” या ध्वनिमुद्रित गीताचे प्रकाशन सजोम ग्रुप पुण्याचे एमडी/सीईओ तुकाराम मेलगे पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाप्रसंगी छ. शिवाजी महाराजांच्या जयजयकारात सादर करण्यात आलेल्या एका शिवकालीन प्रवेशाने सर्वांची वाहव्वा मिळविली.
कृष्णात खोत यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात संकलक व प्रकाशात अनिल पवार यानी ‘असा साकारला शिवराज्याभिषेक ग्रंथ’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पुण्याचे व्याख्याते डॉ. गणेश राऊत हे ‘शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या विषयावर उद्बोधक व्याख्यान दिले. व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
अखेर संमेलनाच्या दुपारी 3 नंतर शेवटच्या सत्रात कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ प्रस्तुत नेताजी डोंगळे, राजेंद्र भोरे, विष्णू गोपाळ सुतार, अशोक बाबुराव पोवार, मनीषा डांगे, निशा साळुंखे आणि विजय सलगर यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ लोककलेतून प्रबोधन व मनोरंजन करणारा कार्यक्रम उस्फुर्त प्रतिसादात पार पडला. संमेलनाचे सूत्रसंचालन एल. पी. पाटील आणि गीता घाडी यांनी केले. संमेलनाला साहित्यप्रेमींसह मराठी भाषिकांनी मोठी हजेरी लावल्यामुळे मराठा मंदिर सभागृह तुडुंब भरले होते.