बेळगाव लाईव्ह :मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि त्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे सीमाभागातील मराठी शाळांची दुर्दशा व मराठी भाषेविषयीची अनास्था दूर करण्यासाठी पालकांमध्ये जागृती करण्याबरोबरच कन्नड सक्ती विरोधात आवाज उठवावा, अशा मागणीचा ठराव निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला.
निपाणी येथील निपाणीकर वाडा येथे मराठी भाषा दिनानिमित्त आज मंगळवारी सकाळी जयराम मिरजकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेअंती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.
तो दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करावा. सीमाभागातील मराठी भाषिकांना शैक्षणिक नोकरी विषयक व वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार कार्यवाही केली असली तरी कर्नाटक शासन त्या सुविधा देण्यास नकार देत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून प्रयत्न करावेत. सीमा भागातील मराठी शाळांची दुर्दशा व मराठी भाषेविषयीची अनास्था दूर करण्यासाठी पालकांमध्ये जागृती करावी कन्नड सक्ती विरोधात आवाज उठवावा.
तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सीमाप्रश्नाला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अथवा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करावे, असा ठराव करण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीस प्रा. अच्युत माने, रमेश निकम, डॉ. प्रकाश रावण, गजानन शिंदे, एम. आर. ढेकळे, प्रताप पाटील, अवधूत खटावकर, बाळासाहेब तोडकर, लक्ष्मीकांत पाटील, रमेश कुंभार, अमोल नारे, मोहन जाधव, बाळासाहेब हजारे, नितीन इंगवले, अजित पाटील, प्रकाश पाटील, अशोक पोळ, प्रशांत गुंडे, विजयराव देसाई -निपाणीकर, सुभाष जोंधळे, उदय शिंदे आदी उपस्थित होते.