बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेतर्फे कर्ज पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मराठी जनतेला मिळवून देण्यासाठी महापालिकेतील मराठी भाषिक नगरसेवकांनी योजनेची मुदत महिनाभर वाढवून घ्यावी, अशी जाहीर विनंती सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी मागणी केली आहे.
बेळगाव महानगरपालिकेतर्फे गरीब लोकांसह विविध संघ संस्थांना तसेच वैयक्तिक कर्ज पुरवठा केला जाणार आहे. याची जाहिरात मराठी वृत्तपत्रात वाचून मी महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
तसेच कर्जाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेबद्दल माहिती जाणून घेतली. ही माहिती देताना अधिकाऱ्यांनी 5 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असून तत्पूर्वी कागदपत्रांची पूर्तता करावी असे स्पष्ट केले. त्यावेळी अवघ्या दोन दिवसात तेही उद्या शनिवार व परवा रविवार सुट्टीचा दिवस आहे, मग लोकांनी कागदपत्रांची पूर्तता कशी करायची? अशी विचारणा केली असता.
अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना कन्नड वृत्तपत्रातून एक महिना आधी आम्ही ही जाहिरात दिली आहे असे सांगितले. तेंव्हा कन्नड वृत्तपत्रातील जाहिरातीमुळे कन्नड भाषिकांना अनुकूल झाले असले तरी मराठी भाषिकांना महापालिकेच्या कर्ज योजनेचा फायदा होणार नाही.
त्यासाठी माझी महापालिकेतील मराठी भाषिक लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी सदर योजनेची मुदत आणखी महिनाभर वाढवून घ्यावी. जेणेकरून त्यांच्या आपापल्या प्रभागातील मराठी भाषिक जनतेला, विद्यार्थ्यांना, महिला संघटनांना, उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या युवकांना महापालिकेच्या कर्ज योजनेचा लाभ होईल, असे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी आपल्या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हंटले आहे.