बेळगाव लाईव्ह :अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (अ.भा.म.सा.प.) व मराठा मंदिर बेळगाव यांच्यातर्फे उद्या रविवार दि 18 फेब्रुवारी 2024 रोजी 5 व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील छ. शिवाजी महाराज संमेलन नगरी (मराठा मंदिर) येथे कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन उद्घाटनाच्या सत्रासह एकूण चार सत्रात होणार आहे. संमेलनाची सुरुवात उद्या रविवारी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी आणि उद्घाटन सत्राने होणार आहे. यावेळी संमेलनाचे उद्घाटक म्हणून उद्योजक व मराठा मंदिरचे चेअरमन अप्पासाहेब गुरव उपस्थित राहणार आहेत. यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे हे स्वागताध्यक्ष असतील.
उद्घाटनाप्रसंगी “शिवराज्याभिषेक” भारताच्या इतिहासातील असामान्य घटना.. या ग्रंथाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष कृष्णात खोत व अ.भा.म.सा.प. बेळगावचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे गीतकार सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या “अखंड महाराष्ट्राचा लढा” या ध्वनिमुद्रित गीताचे प्रकाशन सजोम ग्रुप पुण्याचे एमडी/सीईओ तुकाराम मेलगे पाटील यांच्या हस्ते होईल.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांचे अध्यक्षीय भाषण होईल. त्यानंतर दुसऱ्या सत्रात शिवव्याख्यान होणार आहे. यावेळी संकलक व प्रकाशात अनिल पवार हे ‘असा साकारला शिवराज्याभिषेक ग्रंथ’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त करतील. त्याचप्रमाणे पुण्याचे व्याख्याते डॉ. गणेश राऊत हे ‘शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या विषयावर व्याख्यान देतील. व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत उद्योजक आप्पासाहेब गुरव व निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी विलास नारायण घाडी यांच्या सौजन्याने स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे.
संमेलनाच्या अखेरच्या सत्रात दुपारी 3 नंतर कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा लोककलेतून प्रबोधन व मनोरंजन हा कार्यक्रम होईल. सदर कार्यक्रमाचे सादरकर्ते नेताजी डोंगळे, राजेंद्र भोरे, विष्णू गोपाळ सुतार, अशोक बाबुराव पोवार, मनीषा डांगे, निशा साळुंखे आणि विजय सलगर हे असणार आहेत. तरी साहित्यप्रेमींसह समस्त मराठी बांधवांनी या संमेलनाचा बहुसंख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.