बेळगाव लाईव्ह : विविध समस्यांनी ग्रासलेल्या खानापूरवासियांना दिलासा देण्यात यावा, येथील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना नेगीलयोगी रयत संघाच्या वतीने देण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या खानापूरमध्ये सुमारे २१० गावे आणि ५१ ग्रामपंचायती आहेत, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेला लागून असलेला हा तालुका आजवर राज्यातील प्रत्येक सरकारने दुर्लक्षित केलेला आहे.
या तालुक्यातील गावे आजही अनेक ज्वलंत समस्यांनी ग्रासलेली आहेत. तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायतीने बसवलेल्या बोअरवेल व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना लांबूनच पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. तसेच शहरातील सर्व तलाव व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे गुरांना पिण्याचे पाणी नाही तसेच मासळीचाही तुटवडा आहे. खानापूर तालुक्यातील गावांना रस्त्याची योग्य जोडणी नाही. हा तालुका प्रामुख्याने वनक्षेत्रात असल्याने गावांना रस्ता जोडणी नाही. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून, खानापूरचे लोकप्रतिनिधीदेखील याची दखल घेत नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली.
खानापूरमधून बहुसंख्य नागरिक बसप्रवासाने दररोज कामाच्या ठिकाणी, शाळा, कॉलेजमध्ये जातात. मात्र येथील रस्ता चांगला नसल्याने बस व्यवस्थाही नियमित नाही. वयोवृद्ध, शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून तोही व्यवसाय अत्यंत अडचणीत आहेत.
एकीकडेअतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान तर कधी पावसाअभावी पिकांचे नुकसान होते, सरकार योग्य नुकसान भरपाई देऊ शकत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे.
या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे आरोग्य सेवेवर देखील परिणाम झाला असून या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत खानापूरवासियांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाने पुढाकार घयावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.