बेळगाव लाईव्ह : नाविन्यपूर्ण लोकरीच्या विणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी कौशल्याने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण लोकरीच्या विणकामाची इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे.
आजवर आशा पत्रावळी यांनी विणकाम क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली आहे. जपानी पद्धतीच्या विणकामाचा वापर करून आजवर त्यांनी अनेक लोकरी वस्तूंचा संग्रह तयार केला आहे. या कामाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी नव्याने तयार केलेल्या १६६ लोकरी वस्तूंच्या उल्लेखनीय संग्रहाची दखल घेत इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या या कार्यकौशल्याची नोंद घेण्यात आली आहे.
आपल्या आयुष्याची ३५ वर्षे हि विणकामासाठी समर्पित केलेल्या आशा पत्रावळी यांनी नवजात शिशुसह ३ वर्षाच्या लहानग्यांसाठी नाविन्यपूर्ण आणि आकर्षक अशी विणकामे आजवर केली आहेत.
त्यांच्या या कार्यामुळे त्यांनी स्वतःचे विशिष्ठ स्थान निर्माण केले असून त्यांचे हे कार्य प्रशंसनीय आहे. दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या आशा पत्रावळी यांनी आपल्या या कार्यकौशल्यावर आधारित सहा पुस्तके प्रकाशित केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक महिला, तरुणी प्रशिक्षण देखील घेत आहेत.
पारंपारिक विणकाम तंत्राच्या पलीकडे कौशल्य जपणाऱ्या आशा पत्रावळी यांनी विविध आकारातील वस्तू, विविध पक्षी, फुले, कार्टून कॅरेक्टर्स बनवली आहेत. केवळ चित्रांचा आधार घेऊन त्यांनी अनेकप्रकारचे लोकरीचे विणकाम केले आहे. आकर्षक पद्धतीचे मोजे, टोप्या आणि स्वेटर्स हि त्यांची खासियत आहे. त्यांनी बनविलेल्या लोकरीच्या वस्तू नेहमीच लहानग्यांना आकर्षित करत आल्या आहेत.
आजवर बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्रातही त्यांच्या लोकरीच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शिवाय या लोकरीच्या वस्तूंना बेळगावसह देशभरात आणि परदेशातही मागणी आहे. त्यांच्या या कार्याची दखल लिंक बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
शिवाय त्यांच्या या कार्यासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर आता पुढील यश गाठण्यासाठी त्यांनी तयारीदेखील सुरु केली असल्याची माहिती त्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना दिली आहे.