बेळगाव लाईव्ह- आपल्या ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता ही प्रत्येक बँकेची स्वतःची जबाबदारी आहे, त्यामुळे बँकांनी आपले कर्मचारी आणि संचालक मंडळांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. असा आदेश अलीकडेच भारतीय रिझर्व बँकेकडून काढण्यात आला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन बेळगावातील मराठा बँक, पायोनियर बँक आणि तुकाराम बँक या तीन बँकांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा म्हणजे काय याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवशीय सेमिनारचे आयोजन केले होते.
रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत मराठा सहकारी बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झालेल्या या शिबिरात पुण्याचे सायबर गुन्ह्याचे अभ्यासक श्री हेमंत देशमुख यांनी मौलिक मार्गदर्शन केले. सायबर गुन्हे म्हणजे काय ,कोणकोणत्या प्रकारचे सायबर गुन्हे असतात, त्यांचा कायदा काय आहे आणि सायबर सुरक्षितता अशा विविध विषयावर श्री देशमुख यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
इंटरनेटचा वापर दैनंदिन जीवनात अपरिहार्य बनला असला तरीही तो भरपूर वाढलेला आहे त्यामुळे सायबर गुन्हेगारीही वाढली आहे. अलीकडेच झालेल्या सर्वेनुसार जगभरात डिजिटलायझेशन वाढलेले आहे. वीस ते पंचेचाळीस वयोगटातला ग्राहक आता बँकेत जात नाही ,स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मुक्तपणे होत आहे. असे सांगून आपली संवेदनशील, गोपनीय ,महत्त्वपूर्ण माहिती आपण सोशल मीडियावर देऊ नये .पण आपले पॅन कार्ड ,आधार कार्ड, व फॅमिली फोटो यासारखी महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये.
आपले कुठलेही पासवर्ड दर 21 दिवसांनी बदलावेत, पासवर्ड हे 12 ते 14 कॅरेक्टरचे असावेत ते सोपे व लगेच अंदाज करता येण्यासारखी असू नयेत , आपल्या कितीही जवळच्या माणसाला पासवर्ड सांगू नये, आरबीआयने दिलेल्या सूचनानुसार कार्यरत राहिल्यास सायबर गुन्हे टाळता येतील. असे ते म्हणाले.
सायबर गुन्हेगार हे कशा पद्धतीने एखादे अकाउंट हॅक करतात, त्यासाठी कोणकोणत्या क्लृप्त्या वापरतात याबाबतची माहितीही त्यांनी दिली. कोणत्याही ठिकाणी सायबर हल्ला झाला असल्यास आपल्या नोंदणीकृत मोबाईलवरून 1930 नंबरला त्वरित कळवावे, सर्व कार्ड्स व अकाउंटस ब्लॉक करावेत अशी माहिती त्यांनी दिली. बँकांनी आयटी क्षेत्राशी वाहून घेतलेला एक कर्मचारी नेमण्याची, कर्मचाऱ्यांना वरचेवर प्रशिक्षण देण्याची आणि सायबर पॉलिसी ठरवून ती अंमलात आणण्याची तसेच दरवेळेला आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहेही असे त्यांनी सांगितले.
त्यासाठी दरवर्षी बँकांनी काही रक्कम आपल्या बजेटमध्ये तरतूद करावी .असे ते म्हणाले उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. प्रारंभी मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक करून हेमंत देशमुख यांचा परिचय करून दिला. मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी स्वागत करून पुष्पगुच्छ अर्पण केला. त्यानंतर पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर व तुकाराम बँकेचे संचालक प्रदीप ओऊळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन देशमुख यांचे स्वागत केले.
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन दिगंबर पवार यांनी केले तर दीप प्रज्वलन हेमंत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत बऱ्याच कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले