बेळगाव लाईव्ह :भंगाराच्या दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे ढोर गल्ली वडगाव येथे घडली.
ढोर गल्ली, वडगाव येथील एका भंगाराच्या दुकानाला अचानक आग लागण्याची घटना आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
वृत्तपत्रांची रद्दी वगैरे भंगाराचे साहित्य असल्यामुळे अल्पावधीत आगीने रौद्ररूप धारण केले. परिणामी दुकानात साठा करून ठेवलेले भंगार, वृत्तपत्राची रद्दी, लोखंड, 3 वाहनांचे सुटे भाग वगैरे सर्व साहित्य जळून खाक झाले. स्थानिक लोकांनी प्रारंभी आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
मात्र यश येत नसल्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी सहाय्यक फायर ऑफिसर अरुण माळोदे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महत्प्रयासाने आग आटोक्यात आणली.
चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांच्या गफलतीमुळे सदर आग लागल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. सदर दुर्घटनेमुळे भंगार दुकान मालकाचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे कळते.