बेळगाव लाईव्ह :एकसंबा येथील जोल्ले ग्रुपकडून एकसंबा बिरदेव यात्रेनिमित्त मलिकवाड माळावर आयोजित बैलगाडी शर्यत मैदान दानोळीच्या बंडा खिलारे यांनी अवघ्या १७ मिनिट ३ सेकंदात ८ कि. मी. अंतर पार करत ११ लाख रुपयांच्या बक्षीसावर आपले नाव कोरले. लाखो शर्यत शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या अटी-तटीच्या शर्यती अनुभवावयास मिळाल्या.
गेल्या महिनाभरापासून लाखो शर्यत शौकिनामध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण केलेल्या जोल्ले ग्रुपच्या शर्यती आज लाखोंच्या उपस्थितीत पार पडल्या. विना लाठी-काठी जनरल बैलगाडी शर्यत स्पर्धेत अवघ्या 17 मिनिटे 3 सेकंदामध्ये दानोळीच्या बंडा खिलारे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. बाळू हजारे-शिरूर यांच्या बैलजोडीने १७ मिनिट १० सेकंदात द्वितीय क्रमांक पटकावत ५ लाख, सचिन पाटील यांनी तृतीय क्रमांकासह ३ लाख तर उमेश जाधव-पळशी यांच्या बैलगाडीने चतुर्थ क्रमांक पटकावत २ लाखाचे बक्षीस मिळविले.
कर्नाटक मर्यादित बैलगाडी शर्यतीत अजित देसाई (यरगट्टी) यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक, दऱ्याप्पा संगाप्पा पुंडीबेस (मजलट्टी) द्वितीय, महादेव गजबर (मलिकवाड) तृतीय तर हुवन्ना माने (अभियाळ ता. अथणी ) यांनी क्रमांक पटकावून अनुक्रमे ५ लाख, ३ लाख, २ लाख आणि १ लाख रुपयांच्या बक्षिसांचे मानकरी ठरले.
घोडागाडी जनरल शर्यतीत सांगलवाडी मंगल घोडागाडीने प्रथम, मेजर रुस्तम येडूरवाडी द्वितीय, लगमन्ना तृतीय तर रमेश पाटील-कारंदवाडी (ता. वाळवा) यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे १ लाख, 75 हजार, 50 हजार आणि 25 हजारांचे बक्षीस देण्यात आले. कर्नाटक मर्यादित घोडागाडी शर्यतीत शिवाजी सडके (बा. सौंदत्ती), मारुती घस्ते (संकेश्वर), दत्तू पाटील (कुन्नूर) आणि बाबासाहेब पाटील (नांगनूर) यांच्या गाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते चतुर्थ क्रमांक पटकाविला. विजेत्यांना अनुक्रमे १ लाख , ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपयांचे बक्षीस वितरित कऱण्यात आले.
कर्नाटक-महाराष्ट्रातील विविध भागातून एकसंबा शर्यत मैदान पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने शर्यत शौकीन मलिकवाड माळावर उपस्थित होते. त्यामुळे एकसंबा, सदलगा, मलिकवाड, नणदी , नेज, नागराळ गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठी गर्दी पहायला मिळाली.