बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांचे वक्कुट नियमित बेळगाव या संस्थेतील विविध पदांसाठी झालेल्या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची राज्य सरकार आणि सहकार खात्याने तात्काळ सखोल चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बागोजी यांनी केली आहे.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांचे वक्कुट नियमित बेळगाव या संस्थेमधील रिक्त असलेली सहाय्यक व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी, विस्तर्णाधिकारी वगैरे 46 पदे भरण्यासाठी गेल्या वर्षी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
मात्र या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. शिवाय 46 पदे भरून घेण्याचा सरकारी आदेश असताना 48 पदे भरून घेण्यात आली आहेत. एखादी संस्था नुकसानीत बिकट परिस्थितीतून जात असेल तर संस्थाचालक कर्मचाऱ्यांची नवी भरती करून घेण्याऐवजी असलेली कर्मचारी संख्या कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र या संस्थेत उलट प्रकार झाला आहे. संस्था नुकसानी चालत असतानाही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
तसेच भरती प्रक्रिया देखील व्यवस्थित न राबवता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे असे सांगून प्रकाश बागोजी यांनी कागदोपत्री पुराव्यांसह त्याबाबतची तपशीलवार माहिती दिली.
तसेच राज्य सरकार आणि सहकार खात्याने गांभीर्याने दखल घेऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. येत्या आठ दिवसात माझ्या मागणीचा विचार न झाल्यास मी यासंदर्भात वैयक्तिकरित्या ईडी आणि लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहे असे बागोजी यांनी स्पष्ट केले.