बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या 2024 -25 या आर्थिक वर्षाच्या 43,661.35 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पासह 7 लाख 72 हजार रुपयांचे शिलकीचे अंदाजपत्रक अर्थ व कर स्थायी समितीच्या अध्यक्षा विणा विजापुरे यांनी आज मंगळवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात मांडले. अध्यक्षस्थानी महापौर सविता कांबळे या होत्या.
यावर्षीचा 2024 -25 सालचा 43,661.35 लाख रुपयांचा अर्थसंकल्प हा शहराच्या अभिवृद्धीसाठी तसेच शहरातील सर्व घटकांना लक्षात घेऊन सर्व समावेशक असा तयार करण्यात आला आहे. विशेष करून ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती -जमाती, दिव्यांग तसेच तळागाळातील घटकांच्या हितासाठी अनेक योजनांचा यामध्ये समावेश आहे, असे अंदाजपत्रकाचे वाचन करताना अर्थ व कर स्थायी समितीचे अध्यक्षा विणा विजापुरे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे करांच्या स्वरूपात शहरातून मिळणाऱ्या निधीचा कशाप्रकारे विनियोग केला जाणार याची माहिती त्यांनी दिली. शहर स्वच्छता, ठेकेदारांचा खर्च, पौरकार्मिकांचे वेतन, रस्ते व गटार बांधकाम, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विहिरींचा जिर्णोद्धार वगैरेंसाठी एकूण 436 कोटी 53 लाख 63 हजार रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करवाढीचा किंवा इतर कोणताही अतिरिक्त भार नागरिकांवर लादण्यात आलेला नसल्यामुळे या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी स्वागत केले.
महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प रुपये 43,661.35 लाख रुपयांचा असून खर्चाचे अंदाजपत्रक रुपये 43,653.63 लाख इतके आहे. त्यामुळे महापालिकेचे 2024 -25 सालचे शिलकी अंदाजपत्रक रुपये 7.72 लाख इतके आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. महापालिका व्याप्तीतील मालमत्ता कर वसुली रु. 7350.20 लाख. बांधकाम परवाना महसूल रुपये 200.00 लाख. विकास शुल्क व सुधारणा शुल्क रुपये 1025.00 लाख. अवशेष निर्मूलन शुल्क रुपये 230.00 लाख. इस्कॉन प्रलंबित शुल्क रुपये 1700.00 लाख. रस्ते खोदाई शुल्क रुपये 125.00 लाख. घनकचरा व्यवस्थापन शुल्क रुपये 800.00 लाख. स्थावर मालमत्तेवर अधिभार शुल्क रुपये 110.00 लाख.
मालमत्ता हस्तांतर शुल्क रुपये 550.00 लाख. मूलभूत सुविधांद्वारे मिळणारे उत्पन्न रुपये 50.00 लाख. कर्मचारी वेतनासाठी राज्य सरकारकडून मिळणारा निधी रुपये 8113.77 लाख. एसएफसी निधी अनुदान रुपये 630.00 लाख. एसएफसी विद्युत शक्ती अनुदान रुपये 6690.00 लाख. पालिकेच्या खुल्या जागा विक्रीतून रुपये 1050.00 लाख. या पद्धतीने एकूण रुपये 43,661.33 लाख मिळणार.
अंदाजे खर्च : स्वच्छतेसाठी ठेकेदारांना रुपये 2800.00 लाख. पौरकार्मिकांचे वेतन रुपये 1800.00 लाख. वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट रुपये 400.00 लाख. पथदिपांच्या देखभालीसाठी रुपये 250.00 लाख. पावसाच्या पाण्याचा निचरा रस्ते गटार मार्गदर्शक फलक उभारणी रुपये 1050 लाख. महापालिका व्याप्तीतील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी रुपये 110.00 लाख. खेळांच्या आयोजनासाठी रुपये 14.98 लाख.
निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यासाठी रुपये 30.00 लाख. पत्रकारांच्या हितासाठीचा निधी रुपये 35.00 लाख. महापालिका व्याप्तीतील स्मशानभूमीच्या विकासासाठी रुपये 80.00 लाख. महापालिका व्याप्तीतील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व विहिरींची दुरुस्ती रुपये 25.00 लाख.
अंदाजे भांडवली खर्च : संगणक खरेदीसाठी रुपये 160.00 लाख. शहरातील 58 प्रभागांमध्ये रस्ते निर्मितीसाठी रुपये 500.00 लाख. सीसी रस्त्यांसाठी रुपये 300.00 लाख. गटार बांधकामासाठी रुपये 50.00 लाख. महापालिकेच्या खुल्या जागांच्या रक्षणासाठी रुपये 80.00 लाख. शहरातील चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी रुपये 75.00 लाख. या पद्धतीने एकूण मूलभूत सुविधांसाठी रुपये 1005.00 लाख. शहरातील 58 प्रभागांमध्ये विविध आवश्यक मूलभूत सुविधांसाठी रुपये 1000.00 लाख. एकंदर मूलभूत सुविधांसाठी रुपये 2005.00 लाख. पालिका व्याप्तीतील उद्यानांच्या विकासासाठी रुपये 100.00 लाख. महापालिकेकडून अमृत योजनेच्या कार्यवाहीसाठी रुपये 1500.00 लाख.
स्वच्छ भारत मिशन -01 योजनेमधील मनपाचा वाटा 41.27 टक्क्यानुसार डीपीआर. महसूल संकलनावर 24.10 टक्के राखीव निधी एकूण रुपये 361.00 लाख. अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी 7.25 टक्क्यातून रुपये 108.63 लाख. 5 टक्के दिव्यांगांच्या विकासासाठी व्हील चेअर पुरवण्यासाठी रुपये 74.92 लाख. या पद्धतीने एकूण रुपये 43,653.63 लाख रुपये खर्च आणि एकूण शिल्लक रुपये 7.72 लाख.