बेळगाव लाईव्ह:महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील साई कॉलनी गल्लीतील गटारी गेल्या दोन महिन्यापासून तुंबल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याबरोबरच नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. तसेच तात्काळ गटाऱ्यांची सफाई न झाल्यास गटारीतील घाण रस्त्यावर टाकून निषेध नोंदवण्याची तयारी त्यांनी चालवली आहे.
शहरातील घी गल्ली व खडक गल्ली यामधील साई कॉलनी या गल्लीतील गटारींची गेल्या दोन महिन्यापासून साफसफाई करण्यात आलेली नाही. सध्या कचरा व घाणीमुळे या गल्लीतील गटारी मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधीसह डास माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
डासांचा प्रादुर्भाव 24 तास सुरू असल्यामुळे डास चावून लहान मुलांच्या अंगावर पुरळ उठत आहेत. गटारीतील तुंबलेल्या घाणीमुळे विशेष करून सायंकाळच्या वेळी गल्लीत प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. थोडक्यात तुंबलेल्या गटारीमुळे साई कॉलनी गल्ली येथील लोकांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात स्थानिक नगरसेवकाकडे वारंवार तक्रार करून देखील ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे गल्लीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तरी महापौरांसह महापालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन साई कॉलनी गल्लीतील गटारींची तात्काळ सफाई करण्याचे आदेश द्यावेत अशी जोरदार मागणी केली जात आहे.
त्याचप्रमाणे लवकरात लवकर गटाऱ्यांची स्वच्छता न झाल्यास स्वतः श्रमदानाने गटारातील सर्व घाण रस्त्यावर फेकून निषेध नोंदविला जाईल, असा इशारा साई कॉलनी गल्लीतील संतप्त रहिवाशांनी दिला आहे.