चिक्कोडी शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बहुप्रतीक्षित असलेल्या बायपास रस्त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला असून चिक्कोडी ते गोटूर या चौपदरी महामार्गासाठी 941.61 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली आहे.
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत चिक्कोडी शहरापासून गोटूरपर्यंत 27 कि.मी. अंतराचा रस्ता होणार आहे. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 ला मंजुरी देताना चिक्कोडी -गोटूर रस्त्याच्या कामासाठी 941.61 कोटी मंजूर केले आहेत. त्यामध्ये चिक्कोडी शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास चार पदरी रस्त्याचाही समावेश आहे. सदर 27 कि.मी. अंतराचा रस्ते प्रकल्प वार्षिक योजना 2023 -24 अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे. सुवर्ण चतुर्भुज (चेन्नई -मुंबई) सह उत्तर कर्नाटकशी थेट जोडणारा हा रस्ता असेल. चिक्कोडी -गोटूर चौपदरी रस्त्यामुळे चिक्कोडीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्याशिवाय या भागात दळणवळण अधिक गतीने होऊन विकासात भर पडणार असल्याचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी म्हंटले आहे.