बेळगाव लाईव्ह :कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्यांच्या कालावधीत वर्षभराची वाढ करण्यात आली असून तशी अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने काढली आहे. देशातील एकूण 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी बेळगावसह 56 बोर्डांना ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या एकूण सात सदस्यांचा कालावधी फेब्रुवारी 2021 मध्ये पूर्ण झाला होता. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डवर सहा महिने प्रशासकीय कारभार होता.
त्या सहा महिन्यानंतर संरक्षण मंत्रालयाकडून सुधीर तुपेकर या नामनिर्देशित सदस्याची नियुक्ती करण्यात आली. तुपेकर हे गेल्या सुमारे अडीच वर्षापासून कॅन्टोन्मेंट बोर्डवर नामनिर्देशित सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सदस्यत्वाची सहा महिन्याची मुदत येत्या 10 फेब्रुवारी रोजी संपणार होती.
मात्र आता त्यांना आणखी एक वर्षाची वाढ मिळाली असेन पुढील फेब्रुवारीपर्यंत सुधीर तुपेकर हे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेत हस्तांतरण केले जाणार असल्याने गत एप्रिलमध्ये नियोजन करूनही बोर्डाची निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे त्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे.
मात्र हस्तांतरणाची प्रक्रियाही धीम्या गतीने सुरू असल्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे. तसेच नव्या सीईओंनी हस्तांतरणाची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी केली जात आहे.