Friday, December 27, 2024

/

भाजपने काँग्रेस आमदारांना घेरले!

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगावच्या राजकारणाचे वारे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुसाट वेगाने वाहत असून राजकीय पटलावर सत्ताधारी – विरोधकांमध्ये राजकीय युद्ध तापत चालले आहे. याचा प्रत्यय आज बेळगावमध्ये दिसून आला असून भाजपच्या बेळगाव उत्तर पदाधिकाऱ्यांच्यावतीने बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांना अनुदानाच्या मुद्द्यावरून थेट निवेदन देत घेरण्यात आले.

कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यापासून बेळगाव बेळगाव उत्तर मतदार संघामधील विकासकामांसाठी यावर्षी किती अनुदान आणले ? याचे जाहीर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजप बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार असिफ सेठ यांच्याकडे केली आहे.

विजय कोडगानूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप बेळगाव उत्तर मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शनिवारी आमदार असिफ सेठ यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. आपण आमदार झाला याला आता जवळपास वर्ष होत आले आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या कालावधीत आपल्याकडून मतदार संघाच्या विकासासाठी कोणतेच भरीव कार्य झालेले नाही.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघासाठी आपण किती निधी विकासासाठी मंजूर करून आणला? आपल्या भागातील शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळवून दिली? याचा जाहीर खुलासा करावा अशी मागणी यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.

Bjp cong

भाजपने अनुदानाच्या मुद्द्यावरून घेरल्यानंतर आमदार आसिफ सेठ यांनी माहिती देताना, भाजप सरकारच्या काळात माझ्या मतदारसंघासाठी किती अनुदान मंजूर होतो ते मला माहित नाही. मात्र, सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ९८० कोटी रुपयांच्या अनुदानातून आतापर्यंत केवळ ३० विकास कामे पूर्ण झाली असल्याचे सांगितले.

राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून लोकाभिमुख कार्य सुरू आहे. राज्यातील काँग्रेस सरकार राबवत असलेल्या गॅरंटी योजनांमुळे जनतेला दिलासा मिळाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनुदानाच्या मुद्द्यावरून आमदारांनी विरोधकांना फटकारले!

बेळगाव लाईव्ह : भाजप पदाधिकाऱ्यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना अनुदानाच्या मुद्द्यावरून घेरले. मात्र विरोधकांच्या या खेळीला उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी योग्य प्रत्त्युत्तर देत केंद्राच्या सापत्नभावाच्या वागणुकीमुळे राज्याचे ६२ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत विरोधकांना फटकारले.

भाजप सरकारच्या काळात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ९८० कोटींचे अनुदान जाहीर झाले, त्यापैकी केवळ मागील सरकारमध्ये ३० टक्के कामे झाली. मात्र काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आली. पाचही हमी योजना लागू करण्यात आल्या. महिलांसाठी मोफत बस, रेशन तांदूळ, गृहलक्ष्मी, ग्रहज्योती, युवानिधी यासारख्या हमी योजना राज्यात सुरळीतपणे सुरु आहेत. इतक्या वर्षात भाजपाकडे सत्ता होती त्यावेळी भाजपने किती विकास केला? आणि याचा लेखाजोखा भाजपने कुणाला दिला? आपले सरकार सत्तेवर येऊन ११ महिने झाले असून ११ महिन्यातच विरोधकांनी आपल्याकडे हिशोब मागायला सुरुवात केली. कराच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला निधी केंद्राच्या सापत्नभावाच्या वागणुकीमुळे राज्याला दिला जात नाही. केंद्रात भाजपचेच सरकार आहे. भाजपने दिलेली आश्वासने कितपत पाळली आहेत? निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे खोटे आश्वासन दिले. मात्र काँग्रेस खोटी आश्वासने देत नसल्याचे सांगत विरोधकांवर त्यांनी टीका केली.

गेल्या दहा वर्षात भाजपाला जे जमले नाही ते ४० टक्के कमिशनवर चालणारे सरकार आम्हाला जाब विचारात आहे, हि हास्यास्पद बाब असल्याचेही असिफ सेठ म्हणाले. देशात धर्मावरून राजकारण सुरु आहे. मात्र आम्ही सर्वधर्मसमभाव जपतो. या भावनेमुळे आपला देशाची प्रगती नक्की होईल, याचा आम्हाला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ येतात त्यावेळी धार्मिकतेवरून देशात गदारोळ उठतो. याला भाजप कारणीभूत आहे. मात्र आपला पक्ष पायाभूत आणि मूलभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित करतो, हेच आपल्या पक्षाचे उद्दिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यानंतर राज्यातील जनतेला ज्या हमी योजना लागू केल्या त्या अद्याप अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. मात्र या योजनांसंदर्भात लवकरच जनता दरबार भरविण्यात येणार असून ज्यांना हमी योजनांचा लाभ घेता आला नाही अशा लोकांनी पुन्हा केवायसी भरावी असे आवाहन आमदार असिफ सेठ यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक लढविण्यासाठी १५ ते २० इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. यासंदर्भात हायकमांड निर्णय घेईल, आणि हायकमांडचा निर्णय अंतिम असेल, असेही आमदार असिफ सेठ यांनी स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.