बेळगाव लाईव्ह : महिलांच्या शोषणाच्या विविध पैलूंवर सखोल चिंतन करून संविधान रचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना धार्मिक-सामाजिक-राजकीय अधिकार देण्याचा प्रयत्न केला. आज देशभरात विविध स्तरावर तळागाळातील समाजातील महिला कणखरपणे नेतृत्व करताना दिसत असून बेळगावच्या महापौरपदी देखील दलित समाजातील महिला नेतृत्वाची वर्णी लागली आहे.
१५ फेब्रुवारी रोजी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदावर नव्याने नियुक्ती झाली असून बेळगावच्या महापौरपदी सविता कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपच्या सविता कांबळे या दलित समाजातील असून बेळगावच्या प्रथम नागरिक म्हणून त्यांना आज ऐतिहासिक मान मिळाला आहे.
सविता कांबळे या रायबाग तालुक्यातील शिरगुरा या गावच्या दलित समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या सविता कांबळे यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बेळगावची वाट धरली आणि सदाशिव नगर भागात असलेल्या बेलदार छावणीत त्यांनी आपला संसार थाटला. स्वच्छता कर्मचारी, रोजंदारी करणाऱ्या सविता कांबळे यांनी कालांतराने उदबत्तीच्या फॅक्टरीमध्ये काम केले.
त्यानंतर मेगा हेल्मेट निर्मिती करणाऱ्या कंपनीत रुजू झालेल्या सविता कांबळे यांनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले. आशावादी जीवनशैली जपणाऱ्या सविता कांबळे यांनी सरदार्स हायस्कुलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
समाजसेवेत स्वतःला झोकून देत, महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सविता कांबळे यांनी बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक लढविली. बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३५ मधून त्या निवडून आल्या. आणि आज त्यांना बेळगावच्या प्रथम नागरिक म्हणजेच महापौरपदी विराजमान होण्याचा मान मिळाला. ”कोणत्याही समाजाची प्रगती मोजायची असल्यास, त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीचा निर्देशांक पाहावा” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत आज सविता कांबळे यांच्या माध्यमातून मिळालेला पुरावा आहे, असेच म्हणावे लागेल.
निवडीमागची राजकीय पार्श्वभूमी :
निवडणुका म्हटलं कि राजकारण आणि त्यासाठीचे डावपेच सुरु होतात. बेळगाव मनपा महापौर – उपमहापौर निवडणुकीतही हीच बाब दिसून आली. निवडणुकीच्या दरम्यान नेतेमंडळींनी आपले वर्चस्व राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. दक्षिणचे आणि उत्तरचे माजी आमदार यांनी आपापल्या उमेदवारांचा प्रभाव निवडणुकीदरम्यान उमटवण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तरेच्या माजी आमदारांनी निर्णायक राजकीय भूमिका घेतल्याचे सविता कांबळे यांच्या निवडीनंतर स्पष्ट झाले.
महानगरपालिकेतील एकंदर वातावरण पाहता भाजप यंत्रणेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकप्रकारची वातावरण निर्मिती केल्याचेही दिसून आले. भाजप नगरसवेकांमधील तब्बल २७ नगरसेवक नूतन महापौरांच्या विरोधात असूनही संपूर्ण डाव आपल्या बाजूने वळविण्यात माजी लोकप्रतिनिधींनी बाजी मारली. आणि आपले वर्चस्व राखण्यात देखील यशस्वी ठरले, हे विशेष!