बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची घाईगबडबड सुरु झाली असून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी पायघड्या घालण्याचे काम सुरु झाले आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधणाऱ्या बेळगाव जिल्ह्यावर प्रत्येक निवडणुकीत एक वेगळीच चुरस पाहायला मिळते. राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बेळगावमधून अनेक नेते विधानसभेत कामकाज पाहात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या उमेदवार निवडीच्या हालचालींनाही वेग आला असून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा पक्षश्रेष्टींसोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे.
बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि लोकसभेसाठी काँग्रेसचे प्रबळ इच्छुक असणारे डॉ. गिरीश सोनवलकर हे एकत्र चर्चा करत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. या छायाचित्रामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या उमेदवारीसंदर्भात बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीकडे शिफारस केली होती. काँग्रेसकडेशिफारस करणाऱ्या उमेदवारांमध्ये डॉ. सोनवलकर आणि मृणाल हेब्बाळकर यांच्यासह सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांचाही समावेश आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्राचा अंदाज घेता डॉ. गिरीश सोनवलकर यांचे नाव अधिक चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.
राजकारणाच्या पटलावर कधी काय होईल? आणि कुणाची बाजी कधी पालटेल हे सांगता येत नाही. यामुळे जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसतशी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचणार हे नक्की.