बेळगाव लाईव्ह : आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे सालाबादप्रमाणे बेळगावमध्ये १० आणि ११ फेब्रुवारी रोजी जगन्नाथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या निमित्ताने होणारी हरे कृष्ण रथयात्रा शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी आयोजिण्यात आली आहे, अशी माहिती इस्कॉन, बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
१० फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून रथयात्रेस आरतीने प्रारंभ होईल. धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्लीतून शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली,
कपिलेश्वर रोड ब्रिजवरुन एस पी एम रोड, खडे बाजार – शहापूर, नाथ पै सर्कल, बी एम के आयुर्वेदिक कॉलेज रोड, गोवावेस येथून इस्कॉन मंदिरकडे रथयात्रेची सांगता होईल. रथयात्रेनंतर सायंकाळी ६.०० वाजता इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळनंद मंदिर, टिळकवाडी येथे रथयात्रा पोहोचल्यानंतर इस्कॉन मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे ही रथयात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. मिरवणुकीच्या केंद्रभागी एक भव्य रथ असेल, ज्यात श्री राधा कृष्ण आणि निताई गौर सुंदर भगवान विराजमान होतील. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासह परदेशातूनही कृष्णभक्त या रथयात्रेत सहभागी होणार आहेत.
याचप्रमाणे इस्कॉनचे ज्येष्ठ भक्त परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज, परमपूज्य चंद्रमौली महाराज, भक्ती चैतन्य सुंदर महाराज, वृंदावन प्रभू आणि परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज हेदेखील रथयात्रेत सहभागी होणार आहेत. या रथयात्रेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांवर आधारित देखावे सादर केले जाणार आहेत.
आकर्षकरित्या सजविलेल्या बैलगाड्या, रांगोळ्या, रंगीबेरंगी झेंडे यासह थिठिकाणी प्रसादाचे वाटप देखील करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान इस्कॉन मंदिरात सायंकाळी भजन, कीर्तन, आरती यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचप्रमाणे महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून या उत्सवात बेळगावकरांनी सहभागी होऊन आध्यात्मिक ज्ञान व आनंद अनुभवावा असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी रथयात्रा समितीचे अध्यक्ष बालकिशन भट्टड, ज्येष्ठ भक्त एच. डी. काटवा, श्री राम दास श्री मदन गोविंद दास, संकर्षण दास, अनंत लाड आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.