बेळगाव लाईव्ह :बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी वाहन पार्किंग कंत्राटदार आणि वाहन चालक यांच्यातील वाद नित्याचा झाला असून विमानतळ व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी तेथील वाहन कंत्राटदार आणि वाहन चालक यांच्यात पार्किंग शुल्कावरून वाद झाला नाही असे क्वचितच घडते.
संबंधित कंत्राटदार मनमानी शुल्क आकारणी करत असल्यामुळे नेहमी विमानतळाकडे जावे लागणाऱ्या वाहनचालकात त्याच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जाते सदर कंत्राटदार तब्बल सुमारे 500 -800 मी. दूर अंतरावर पार्किंगच्या ठिकाणी बसून टर्मिनल इमारती समोर 3 मिनिटांहून अधिक काळ थांबणाऱ्या वाहन चालकांकडून पार्किंग शुल्क आकारणी करतो.
त्यामुळे इतक्या दूर अंतरावर असूनही कंत्राटदाराला टर्मिनल इमारतीसमोर एखादे वाहन 3 मिनिटापेक्षा जास्त काळ थांबले आहे हे कसे काय कळते? हे वाहन चालकांच्या दृष्टीने एक रहस्यच झाले आहे. विमानतळाच्या वाहन पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क करायचे नसेल तर टर्मिनल इमारती समोर प्रवाशांच्या वाहनातील चढ उतारासाठी (पिकप/ड्रॉप) 3 मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे.
तथापि एन्ट्री गेटपासून एक्झिट पॉईंटपर्यंत कोठेही पार्किंग न करता प्रवाशांना पिकप/ड्रॉप करण्यासाठी वाहनांना एकूण 10 मिनिटांचा (7 मि. अधिक चढ-उतारासाठी 3 मि.) कालावधी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अनाधिकृत पार्किंगसाठी 500 रु. दंड आकारला जातो. प्रवासी वाहनांकडून हे नियम पाळले जात असताना विमानतळाच्या पार्किंग कंत्राटदाराकडून वाहन चालकांची लुबाडणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
कहर म्हणजे हा कंत्राटदार कांही वाहन चालकांकडून विमानतळ आवारात प्रवेश करतानाच टर्मिनल इमारतीसमोर 3 मिनिटापेक्षा अधिक काळ थांबण्याच्या दंडाची रक्कम आधीच आगाऊ वसूल करत असल्याचा आरोप आहे. तरी विमानतळ व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पार्किंग कंत्राटदाराला चांगली समज देण्याची मागणी होत आहे.