बेळगाव लाईव्ह:येत्या 15 दिवसाच्या आत बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय जागी छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत श्री बसवेश्वर यांची शिल्प बसविण्यात यावीत. अन्यथा भीमसैनिक, शिवसैनिक आणि बसव सैनिक संयुक्तरीत्या स्वतः येऊन ही शिल्प लावतील. त्यावेळी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झाला किंवा गोळ्या घातल्या तरी कोणत्याही परिस्थितीत शिल्प उभारण्यात येतील, असा इशारा श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दिला.
श्रीराम सेना हिंदुस्तान आणि विविध दलित संघटनातर्फे आज सोमवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानक येथे छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोंडुसकर प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, बेळगाव रेल्वे स्थानक उभारून एक वर्ष होऊन गेलं स्थानकाचे उद्घाटन ही दिमाखात झालं. मात्र वारंवार मागणी करून देखील छ. शिवाजी महाराज आणि ज्यांच्यामुळे आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय जागी लावण्यात आलेली नाहीत.
दरम्यान त्यामध्ये काही राजकीय नेते मंडळींनीही आपला स्वार्थ साधून घेतला. छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प गोडाऊनमध्ये धुळखात ठेवण्यात आल्या होत्या. आपल्या देशात त्यांचा या पद्धतीने मोठा अवमान रेल्वेचे अधिकारी राजकीय व्यक्ती करत आहेत. कळत नकळत आपणही करत आहोत. आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ यायला नको होती. मात्र दुर्दैवाने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि येथील रेल्वे अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे आमच्यावर ती वेळ आली आहे. गेल्या वर्षी आम्ही सर्वांनी आंदोलन केले. रात्री 2 वाजेपर्यंत रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी सर्वजण बसून होतो. छ. शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकर यांची शिल्प स्वाभिमानाने येथे लावा अशी आमची मागणी होती.
त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी 2 महिन्यात शिल्प लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन्ही शिल्प रेल्वे स्थानक आवारात पुन्हा धुळखात पडली असून हा समाजाचा, संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे. आज आम्ही या ठिकाणी शिवरायांसह डाॅ. आंबेडकर व जगतज्योती बसवेश्वर यांचे पूजन केले आहे.
यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की येत्या 15 दिवसात राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस अथवा रेल्वे प्रशासन यांना आजपासून 15 दिवसांचा अंतीम अवधी दिला जाईल. त्या कालावधीत ही तीनही शिल्प रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भागात लावली गेली नाही तर भीमसैनिक शिवसैनिक आणि बसव सैनिक असे आम्ही सर्वजण संयुक्तरीत्या स्वतः येऊन ही शिल्प लावू. त्यावेळी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झाला किंवा गोळ्या घातल्या तरी कोणत्याही परिस्थितीत शिल्प उभारण्यात येतील. या आंदोलनात कोणतेही राजकारण किंवा भाषिक तेढ नाही आहे. आपल्या देशाची अस्मिता, स्वाभिमान, संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न आहे. संत बसवेश्वरांनी कसे जगावे हे शिकवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघर्ष करा आणि आपला हक्क मिळवा असे सांगितले, तर छ. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून देशातील गोरगरीब जनतेला जगण्याचा महामंत्र दिला. तेंव्हा या तीनही महापुरुषांच्या प्रतिमा लावल्या गेल्याच पाहिजेत असे सांगून याप्रकरणी रेल्वे अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप रमाकांत कोंडुसकर यांनी केला.
दलित नेते मल्लेश चौगुले यावेळी बोलताना म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहीत असताना छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरू बसवण्णा यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं त्याचा आधार घेतला. मात्र या तीनही महापुरुषांच्या प्रतिमांचा बेळगाव रेल्वे प्रशासनाकडून अपमान केला जात आहे. या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्यासाठी परवानगी लागते असे रेल्वे अधिकारी सांगतात ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. हे अधिकारी आपल्या या कृतीतून देशात जातीवादाचे बीज रोवत आहेत. ज्यांच्यामुळे तुम्ही अन्न खाता, अंगावर कपडे घालता, इतकं भव्य रेल्वे स्थानक उभारण्यात आलं हे सर्व कांही गोरगरीब जनतेच्या करातून उपलब्ध झाले आहे. याची थोडी तरी शरम अधिकाऱ्यांना वाटली पाहिजे. आता आमची सहनशक्ती संपली आहे. तेंव्हा कोंडुस्कर यांनी सांगितल्याप्रमाणे 15 दिवसाच्या आत दोन्ही प्रतिमा रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी लावण्यात याव्यात अन्यथा त्यानंतर जिंकू किंवा मरू या निर्धाराने आम्ही त्या प्रतिमा स्वतः लावू हे मी आज शिवरायांच्या जयंती दिवशी स्पष्ट करत आहे. राष्ट्रपुरुषांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे असे चौगुले यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी आज सकाळी तिथे खाली ठेवण्यात आलेल्या छ. शिवरायांच्या शिल्पाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्तान आणि विविध दलित संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी छ. शिवाजी महाराज की जय, जय भीम बोलो, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी वगैरे घोषणा देऊन रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि दलित नेते मल्लेश चौगुले यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली मागणी त्यांच्यासमोर मांडली तसेच येत्या 15 दिवसात शिवरायांसह आंबेडकर आणि संत बसवेश्वर यांची शिल्प रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय ठिकाणी लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तुम्ही यापूर्वी दिलेले मागणीचे निवेदन आम्ही आमच्या वरिष्ठांकडे धाडले असल्याचे सांगून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.