बेळगाव लाईव्ह :बेळगावातील महिलेच्या विवस्त्र धिंड प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून पीडित महिलेच्या सुरक्षेची स्थानिक पोलीस ठाण्याकडून सातत्याने काळजी घेतली जात आहे, अशी माहिती कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयासमोर सादर केली आहे.
पीडित महिलेला नुकसान भरपाई दिल्याचा आणि याप्रकरणी हाती घेण्यात आलेल्या पुढील तपासा संदर्भातील प्रगतीचा अहवाल राज्याने न्यायालयासमोर सादर केला आहे. गेल्या महिन्यात पीडित महिलेला मारहाण करून तिची गावात विवस्त्र धिंड काढण्याबरोबरच तिला रस्त्याशेजारील विजेच्या खांबाला बांधून घालण्यात आले होते. सदर महिलेचा मुलगा गावातील एका मुलीसोबत पळून गेल्यामुळे हे निंद्य कृत करण्यात आले होते.
स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्ना बी. वराळे आणि न्यायाधीश कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठाने सदर प्रकरणी बहुतांश तपास पूर्ण झाल्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
ज्यामध्ये स्टेटमेंट्स रेकॉर्डिंगचा समावेश असून अधिकारी सीआरपीसीच्या कलम 178 अंतर्गत आपला अंतिम अहवाल सादर करण्याच्या तयारीत आहेत, असे सांगितले.
याखेरीज पीडित महिलेला नुकसान भरपाई दाखल कांही ठराविक रक्कम, त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून कर्नाटक वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास योजनेअंतर्गत भूखंडाचे वितरण करण्यात आले असल्याची नोंद खंडपीठाने घेतली आहे.