बेळगाव लाईव्ह :भारतासह जगभरातील हिंदूंचे लक्ष लागून असलेला अयोध्येतील ऐतिहासिक असा श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा आज संपन्न होत आहे.
दोन दशकांपूर्वी म्हणजे 2001 मध्ये वडगाव येथील चित्रकार महेश परशराम होनुले यांनी कार्डबोर्ड अर्थात पुठ्ठ्यापासून बनविलेली श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तेंव्हाही आणि अयोध्येतील सोहळ्यानिमित्त आजही प्रशंसेस पात्र ठरत आहे.
पूर्वी येळ्ळूर आणि सध्या संभाजीनगर, वडगाव येथील रहिवासी असलेले महेश होनुले हे जलरंगात चित्रे काढणारे पूर्णवेळ व्यावसायिक चित्रकार आहेत. येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या महेश यांनी अनगोळ येथील उमा फाईन आर्ट इन्स्टिट्यूटमधून आर्ट मास्टर ही पदवी संपादन केली आहे.
त्यावेळी म्हणजे 2001 मध्ये कलेचे शिक्षण घेत असताना अयोध्येतील तत्कालीन नियोजित श्रीराम मंदिराचे छायाचित्र त्यांच्या बघण्यात आले. क्राफ्ट हा विषय असल्यामुळे महेशना ते चित्र इतके भावले की त्यांनी त्याची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जवळपास महिना -दीड महिना खपवून त्यांनी कार्डबोर्ड अर्थात पुठ्ठ्यांच्या सहाय्याने श्री राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली. महेश होनुले यांनी बनवलेली ही प्रतिकृती 36 इंच लांबी आणि साधारण 16 इंच रुंदीसह 30 इंच उंचीची आहे.
श्री राम मंदिर वास्तूची जवळपास सर्व वैशिष्ट्य या प्रतिकृती दर्शविण्यात आली आहेत. श्री राम मंदिराची देखणी प्रतिकृती बनविणाऱ्या महेश होनुले यांच्या कलाकुसरीचे त्यावेळी सर्वत्र कौतुक व प्रशंसा झाली होती.
महेश यांनी आपल्या घरी जपून ठेवलेल्या त्या प्रतिकृतीची आता जवळपास 23 वर्षानंतर अयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सध्या देखील वडगाव परिसरात मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे.