बेळगाव लाईव्ह :सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना राज्यातील मद्यपिंनी गेल्या रविवारी 31 डिसेंबर रोजी एकाच दिवशी तब्बल 193 कोटी रुपयांची दारू रिचवली आहे. एकट्या बेळगाव दक्षिण जिल्ह्यात थर्टी फर्स्टला एकूण 2 कोटी 90 लाख 87 हजाराची दारू आणि 57 लाख 85 हजार रुपयांची बियर फस्त झाली आहे.
अबकारी कार्यालयाचे विभाजन झाल्यानंतर बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती व गोकाक तालुके मिळून दक्षिण जिल्हा बनविण्यात आला आहे. केवळ या सात तालुक्यांमध्ये 31 डिसेंबर रोजी एका रात्रीत 2 कोटी 90 लाख 87 हजार रुपये किमतीची व्हिस्की व रम, तर 3151 बॉक्स बिअर खपली आहे.
या बियरची किंमत 57 लाख 85 हजार रुपये होते. गेल्या डिसेंबर महिन्यात राज्यात भारतीय बनावटीचे 3,07,953 दारूचे बॉक्स आणि 1,95,005 बिअर बॉक्सची विक्री झाली आहे. राज्यातील 1031 एमएसआयएल मद्यविक्री दुकानांमध्ये 18.85 कोटी रुपयांची विक्रमी दारू विक्री झाली आहे.
अबकारी करातून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. 31 डिसेंबरला सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी विक्रमी मद्य विक्रीतून राज्य सरकारला भरघोस उत्पन्न मिळाले आहे.
यंदाच्या डिसेंबरमधील दारू विक्रीतून सरकारला 3000 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मागील वर्षी 31 डिसेंबर 2022 रोजी एमएसआयएल मध्ये 14.51 कोटींची मद्य विक्री झाली होती. हे प्रमाण यंदा 4.34 कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसून आले आहे.