बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील सुभाषचंद्रनगर येथे गतिरोधकांना अभावी (स्पीड ब्रेकर) वारंवार अपघात घडत आहेत. यासाठी येथील रस्त्यांवर आवश्यक ठिकाणी विशेष करून वळणावर स्पीड ब्रेकर बसवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
संपूर्ण सुभाषचंद्रनगरमध्ये एकाही रस्त्यावर स्पीडब्रेकर बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे येथील रस्त्यांवर भरधाव वेगाने वाहने हाकली जातात. परिणामी या भागात विशेष करून वळणाच्या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.
गेल्या दोन महिन्यात येथे जवळपास 25 अपघात झाल्याचे सांगण्यात येते. आज सकाळी देखील एका दुचाकीस्वाराला अपघाताला सामोरे जावे लागले. दैव बलवत्तर म्हणून त्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही.
यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक आप्पासाहेब गुरव म्हणाले की, आमच्या भागातील रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. मात्र तो विकास करताना कांही वळणांवर स्पीड ब्रेकर घालण्याची आवश्यकता होती ते घालण्यात आलेले नाहीत. या संदर्भात आम्ही पोलिस प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. मात्र आजतागायत त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
त्यामुळे विशेष करून वळणाच्या ठिकाणी दररोज एखाद दुसरा अपघात घडत आहेत. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन सुभाषचंद्रनगर येथील रस्त्यांवर आवश्यक ठिकाणी तात्काळ स्पीडब्रेकर्स घालावेत अशी आमची मागणी आहे असे गुरव यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे अन्य एका रहिवाशाने रस्त्यावर स्पीड ब्रेकर घालताना त्यावर रिफ्लेक्टर बसवणे आणि इशाराचे फलक लावणे यांचीही पूर्तता केली गेली पाहिजे असे स्पष्ट केले. याप्रसंगी सुभाषचंद्रनगर येथील रहिवासी आणि महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य बहुसंख्येने उपस्थित होत्या.