बेळगाव लाईव्ह :नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर गेल्या 17 ते 19 जानेवारी दरम्यान झालेल्या 9 व्या स्मार्ट सिटी इंडिया एक्सपो -2024 मध्ये बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला दोन पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
सामाजिक क्षेत्र व नगर प्रशासनात केलेल्या सुधारणेची दखल घेत हे दोन पुरस्कार देण्यात आले आहेत. हे पुरस्कार मास्को रशिया बाह्य अर्थशास्त्र व आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे प्रमुख सर्गेय चेरेमिन यांच्या हस्ते बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका सईदा बळ्ळारी यांनी स्वीकारले.
याप्रसंगी विज्ञान तंत्रज्ञान खात्याच्या सहसंचालिका धनलक्ष्मी, निवृत्त आयएएस अधिकारी प्रदीप सिंग खरोला आदी मान्यवर उपस्थित होते.
बेळगाव येथे गेल्या बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय विकास आढावा बैठकीमध्ये जिल्हा पालक सचिव अंजुम परवेज यांनी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळवल्याबद्दल स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका बळ्ळारी यांचा गौरव करून अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह स्मार्ट सिटी तसेच इतर खात्याचे अधिकारी उपस्थित होते.