बेळगाव लाईव्ह :बेंगलोर येथे तीन वर्षांपूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर बेळगाव येथे दंगल घडवून आणल्याचा आरोप ठेवत म. ए. समितीचे नेते व कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या खटल्यांपैकी दोन खटल्यांमध्ये आज गुरुवारी तृतीय जेएनएफसी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल होऊन चार्ज फ्रेम झाली आहे.
सदर खटल्यांची पार्श्वभूमी अशी की, गेल्या 2020 मध्ये बेंगलोर येथे छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली होती. सदर घटनेचा त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे आंदोलन छेडून निषेध करण्यात आला होता. या संदर्भातील दोन खटले आज न्यायालयासमोर आले. त्यामध्ये रमाकांत कोंडुसकर, सरिता पाटील, आणि मदन बामणे आदींनी ध. संभाजी महाराज चौकामध्ये प्रक्षोभक भाषण केल्यामुळे दंगल उसळली.
त्या दंगलीत कर्नाटक सरकारच्या अधिवेशनासाठी बेळगावात आलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. शिवनेरी नामक स्टुडिओ फोडण्यात आला. या पद्धतीने 60 हजार रुपयांच्या सार्वजनिक व सरकारी मालमत्तेचे नुकसान केले असल्याचा आरोप ठेवत खडेबाजार पोलीस ठाण्यात उपरोक्त सर्वांवर भा.द.वि. कलम 143, 147, 148, 427, 109, 153 आर /डब्ल्यू 149 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
- त्यादिवशी एकूण सात गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी एक कॅम्प पोलीस ठाण्यात, एक मार्केट पोलीस ठाण्यात आणि पाच गुन्हे खडेबाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. यामधील सी.सी. 33 /2022 आणि सी.सी. 34 /2022 या दोन खटल्यासंदर्भात आज गुरुवारी दोषारोप पत्र दाखल होऊन तृतीय जेएनएफसी न्यायालयाने चार्ज फ्रेम केली.
आता सदर खटल्यांच्या कामकाजाला येत्या दि. 22 फेब्रुवारी 2024 पासून फिर्यादींच्या साक्षीने प्रारंभ होणार आहे.
सदर दोन खटले महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत जयवंत कोंडुसकर, माजी महापौर सरिता पाटील, प्रकाश शिरोळकर, भारत लक्ष्मण मेणसे, नरेश राजू निलजकर, लोकनाथ उर्फ लोकेश जयसिंग राजपूत, हरीश प्रेमकुमार मुतगेकर, मदन बाबुराव बामणे आणि विनायक उर्फ तावर पिराजी कंग्राळकर अशा 11 जणांवर दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. महेश बिर्जे आदी वकील खटल्याचे काम पहात आहेत