बेळगाव लाईव्ह :बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची यादी हाय कमांडकडे धाडण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
बेळगाव लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी 10 जण तर चिकोडी मतदारसंघातून 6 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मंत्र्यांना कोणताही मानदंड नाही. सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी 28 मतदारसंघांमध्ये विजय मिळणे अशक्य आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार पराभूत झाल्यास मंत्र्यांना दोषी धरले जाईल असे जे सांगितले जात आहे ते खोटे आहे. तसेच गेल्या सहा महिन्यात राज्यातील लोकसभा मतदारसंघात अंतर्गत सर्वेक्षण केले जात आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
चोर्ला रस्त्याचे दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून येत्या एप्रिल पर्यंत ते पूर्ण होईल. त्याचप्रमाणे येत्या सहा महिन्यात हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम देखील पूर्ववत सुरू होईल. खाऊ कट्ट्या संदर्भात सरकारला संपूर्ण अहवाल देण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव महापालिकेतील लोकप्रतिनिधींना भाषेबाबत जबरदस्ती करणे चुकीचे आहे. त्यांनी स्वयंप्रेरणेने कन्नड बोलले पाहिजे. त्यासाठी त्यांना जबरदस्ती करणे ही लोकशाहीची लक्षणे नव्हे. असे परखड मत व्यक्त करून मंत्री जारकीहोळी यांनी लोकशाहीत कोणीही कुठलीही भाषा बोलू शकतो. बेळगावचा भाग पूर्वी मुंबई प्रांतात होता. त्यामुळे मराठी भाषेचा प्रभाव येथे आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कर्नाटकात कन्नड भाषेच्या सक्तीची अंमलबजावणी का करू नये? तसेच कन्नड येत असतानाही महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी मराठी बोलतात याबद्दल प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
बेळगावातील फ्लाय ओव्हरच्या लांबीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हा फ्लाय ओव्हर अंदाजे 3.5 कि.मी. अंतराचा असेल असे सांगून तो संकम हॉटेलपासून लिंगराज कॉलेजपर्यंत असण्याची शक्यता मंत्री जारकीहोळी यांनी वर्तवली.
तसेच या संदर्भात सर्व कागदपत्रे केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले असून फ्लाय ओव्हर लांबी वगैरे बाबत केंद्र सरकारच अंतिम निर्णय घेणार आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. हलगा -मच्छे बायपाससाठी अद्यापही जमीन संपादन करण्याची प्रक्रिया बाकी असून लवकरच ती देखील पूर्ण केली जाईल अशी माहितीही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.