बेळगाव लाईव्ह :क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सोसायटीच्या ठेवीदारांना आणि लाभार्थींना अतिरिक्त कागदपत्रांसह मागणी अर्ज दाखल करण्यासाठीचा कालावधी दि. 18 जानेवारी ते दि. 7 फेब्रुवारी 2024 असा निश्चित करण्यात आला असून या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत.
संगोळ्ळी रायण्णा सोसायटीतील अपहार प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष अधिकाऱ्यांकडून तथा सक्षम प्राधिकरणाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तथापि यावेळीही बेंगलोर येथील कार्यालयातच अर्ज दाखल करावे लागणार असल्यामुळे ठेवीदारांना पुन्हा बेंगळूर गाठावे लागणार आहे.
याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये विशेष अधिकाऱ्यांनी संगोळ्ळी रायण्णा सोसायटीच्या ठेवीदारांना कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. त्यासाठी बेळगाव व उत्तर कर्नाटकातील हजारो ठेवीदारांनी बेंगलोर शहर गाठले होते. मात्र त्या सर्व ठेवीदारांची बेंगलोरमध्ये बरीच हेळसांड झाली होती.
त्यामुळे विशेष अधिकाऱ्यांच्या कार्यालयातूनच ठेवीदाराने अर्ज घेतले होते, शिवाय आवश्यक माहिती भरून कागदपत्रे जोडून ते अर्ज विशेष अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा केले होते. मात्र आता अतिरिक्त दाखले किंवा कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्यासाठी नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
काल गुरुवारपासून अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी येत्या 7 फेब्रुवारीपर्यंतची मुदत असल्याने ठेवीदारांना बेंगलोरला जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.