बेळगाव लाईव्ह :अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने बेळगावात देखील सण साजरा केला जात असून शहरात राममय वातावरण निर्माण झाले आहे. या निमित्ताने भगवे ध्वज, पताका, श्रीरामाच्या तसबिरी, रांगोळी, पणत्या, मिठाई वगैरेंची मागणी वाढली आहे.
अयोध्येतील श्री राम मंदिर सोहळ्यानिमित्त शहरातील बाजारपेठ भगवीमय झाली आहे. बाजारपेठेत दिवाळी सणाप्रमाणे खरेदीची धांदल उडाल्याचे पहावयास मिळत आहे गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार आणि शहराच्या इतर बाजारपेठेत भगव्या पताका, श्रीरामाचे चित्र असलेले भगवे ध्वज, रंगीबेरंगी रांगोळ्या, पणत्या आदी सणासाठी आवश्यक असणारे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यांची खरेदी देखील जोमाने सुरू आहे.
या संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना पांगुळ गल्ली येथील डी. के. आर्टचे मालक दौलत कावळे म्हणाले की, श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने गेले दोन महिने भगवे झेंडे, पताका, टोप्या व शालींची विक्री सुरू आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत लोकांचा इतका मोठा प्रतिसाद मिळत आहे की होलसेल व रिटेल व्यवसायाला चांगले प्रोत्साहन मिळाले आहे.
प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज 30 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत. प्रभू श्रीरामांच्या तसबिरींना देखील भरपूर मागणी आहे. भगवे झेंडे, पताका, टोप्या, शाली वगैरेंसाठी महाराष्ट्र, गोवा व कारवार येथूनही मागणी वाढली आहे असे सांगून सदर साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यामुळे त्यांचा तुटवडा निर्माण होत आहे अशी माहिती दौलत कावळे यांनी दिली.
मार्केट यार्ड व्यापाऱ्यांतर्फे उद्या प्रभू श्रीराम मुर्तीची मिरवणूक
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विधिवत लोकार्पण सोहळा उद्या सोमवार दि. 22 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. त्याचे औचित्य साधून एपीएमसी मार्केट यार्ड मधील सर्व व्यापारी बंधुंतर्फे उद्या प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची भव्य मिरवणूक, पुजा आणि प्रसाद वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम स्थळ मार्केट यार्डचे मुख्य प्रवेशद्वार हे आहे. प्रारंभी येथून उद्या सोमवारी सकाळी ठीक 9:30 वाजता रथामध्ये विराजमान असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक धान्य मार्केट, कांदा मार्केट मार्गे प्रस्थान करून श्री गणेश मंदिर येथे पोहचेल. तिथे श्री गणेश पूजन करून पून्हा कांदा मार्केट, रताळी -बटाटा मार्केट, मार्गे मार्गस्थ होऊन हनुमान मंदिर येथे पोहचेल. तेथे श्री हनुमान पूजन करून मिरवणूकीची माघारी मुख्य कार्यक्रम स्थळी प्रवेश द्वारावर सांगता होईल. मुख्य कार्यक्रम स्थळी अयोध्येतील मुहूर्ताप्रमाणे पुरोहित व स्वामीजींच्या हस्ते पुजाअर्चा संपन्न होईल.
याप्रसंगी स्वामीजींचे आध्यात्मिक मार्गदर्शन होईल. त्यानंतर सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप केले जाईल. समस्त व्यापारी कर्मचारी बंधुसाठी दुपारच्या अल्पोपहाराची सोय असेल. तरी सर्व व्यापारी बंधुना प्रत्येक दुकानवर लावण्यासाठी आज भगवे ध्वज व पताका देण्यात येतील ते सर्वांनी घेवून घेऊन जाऊन आपापल्या दुकानावर लावण्याबरोबरच उद्या सकाळी दुकानासमोर सडासंमार्जन (स्वच्छता) करावी. तसेच उद्याच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी भगव्या रंगाचा पेहराव करून ठीक 9 वाजता कार्यक्रम स्थळी हजर रहावे, असे आवाहन एपीएमसी मार्केट यार्ड समस्त व्यापारी बंधुंतर्फे करण्यात आले आहे.