बेळगाव लाईव्ह :स्टॉल्स व इतर ठिकाणच्या नामफलकावरील 60 टक्के कन्नड भाषेच्या सक्तीमुळे निर्माण झालेल्या समस्येचे निवारण करत रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे उद्या शुक्रवारपासून 27 व्या रोटरी अन्नोत्सवाचे आयोजन केले जात असून या उत्सवाला बेळगाव शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्दन्नावर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे उद्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या 27 व्या रोटरी अन्नोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सीपीएड मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिद्दन्नावर म्हणाले की, गेल्या 26 वर्षात रोटरी अन्नोत्सवाचे आयोजन करताना आम्हाला कोणतीच अडचण आली नाही. मात्र गेल्या चार दिवसांपासून जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून उत्सवातील स्टॉल्सच्या नामफलकांवरील 60 टक्के भागात कन्नड आणि उर्वरित भागात अन्य भाषेचा मजकूर असावा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे यापूर्वीच तयार करण्यात आलेल्या नामफलकांमध्ये ऐनवेळी बदल करण्याचे कष्ट आम्हाला घ्यावे लागले.
स्टॉल धारकांनी दिलेल्या त्यांच्या लोगो व मजकुरानुसार नामफलक तयार करण्यात आले होते. मात्र आता प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचीनुसार अक्षरांच्या मोठ्या आकारामुळे सर्व अक्षरे नाम फलकात सामावणे अशक्य झाल्यामुळे कांही मजकूर गाळावा लागला. त्यामुळे स्टॉल धारकांची थोडी नाराजी आम्हाला ओढवून घ्यावी लागली आहे. सर्व स्टॉल्सच्या नामफलकांमध्ये कन्नडला प्राधान्य दिले असले तरी प्रत्येक फलकावर मराठी असणारच. अन्नोत्सवाचे सर्व होर्डिंग्स, बॅनर्स, नामफलक लावण्यात आलेले असताना अचानक प्रशासनाकडून 60 टक्के कन्नडचा फतवा निघाल्यामुळे गेल्या चार दिवसात आमच्यावरील ताण प्रचंड वाढला होता. महिनाभर आधी प्रशासनाची कन्नड बाबतीतील मार्गदर्शक सूची आम्हाला मिळाली असती तर कोणतीच समस्या निर्माण झाली नसती.
‘रोटरी’ ही एक धर्मादाय संघटना असून आजपर्यंत आम्ही कोणताही जाती -धर्म अथवा भाषेच्या बाबतीत भेदभाव केलेला नाही. आज रोटरी क्लबमध्ये बेळगावातील आघाडीचे डॉक्टर्स, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी यांचा समावेश आहे. आमच्या क्लबमध्ये मराठी कन्नड वगैरे सर्व भाषेचे लोक असून आम्ही सर्वजण एकोप्याने राहतो. रोटरीच्या प्रत्येक अन्नोत्सवातून मिळणाऱ्या नफ्यातून आम्ही समाज हिताचे उपक्रम राबवत असतो. त्यामुळे 60 टक्के कन्नड यासारखे एखाद्या गोष्टीच्या सक्तीचे प्रकार प्रशासनाकडून घडू लागले तर भविष्यात अन्नोत्सवासारखे लोकांना मनोरंजन मिळवून देणारे उपक्रम राबवायचे की नाही? याचा आम्हाला विचार करावा लागेल असे स्पष्ट करून रोटरी अन्नोत्सवाला शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन जयदीप सिद्दन्नावर यांनी केले.
अन्नोत्सवाबद्दल बोलताना रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे आयोजित यंदाच्या या अन्नोत्सवामध्ये 187 स्टॉल्स असणार असून त्यापैकी 80 स्टॉल्स हे खाद्यपदार्थांचे असणार आहेत. त्यामध्ये स्थानिक खाद्य पदार्थांसह जम्मू काश्मीर, राजस्थान, लखनऊ, हैदराबाद वगैरे देशातील विविध ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा समावेश असणार आहे.
अन्नपदार्थांचे स्टॉल्स वगळता इतर सर्व कंझ्युमर स्टॉल्स असणार आहेत. याव्यतिरिक्त सलग दहा दिवस चालणाऱ्या या अन्नोत्सवांमध्ये दररोज नवनवे मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. त्यासाठी कर्नाटक व गोव्यासह महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर वगैरे ठिकाणचे कलाकार येणार आहेत. मनोरंजनात्मक कार्यक्रमांची सुरुवात उद्या अखिल भारतीय शरीर सौष्ठव स्पर्धेने होणार आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते अन्नावोत्सवाचे औपचारिक उद्घाटन आणि सायंकाळी 6 वाजता एमएलआयआरसीचे कमांडंट जोयदीप मुखर्जी यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन केले जाईल. अन्नोत्सव कालावधीत 13 जानेवारी रोजी 35 वर्षे वयावरील महिलांसाठी ‘मिस सुपर वुमन’ स्पर्धा घेतली जाणार आहे.
लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ॲम्युझमेंट पार्क देखील असणार आहे असे सांगून अन्नोत्सवा काळात प्रामुख्याने स्वच्छता आणि साफसफाईची विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासंदर्भात खास करून अन्नपदार्थ स्टॉलधारकांना सुचित करण्यात आले आहे अशी माहिती सिद्दन्नावर यांनी दिली. पत्रकार परिषदेस सुरेश मेत्रानी, निरंजन संत, डॉ संतोष पाटील आदी उपस्थित होते.