Wednesday, January 1, 2025

/

बेळगावच्या सुजय सातेरीचे रणजी पदार्पण

 belgaum

बेळगाव लाईव्ह :यंदाच्या 2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इलाईट ‘क’ गटातील गुजरात विरुद्धच्या सामन्यात कर्नाटक संघाला अनपेक्षित पराभव पत्करावा लागला असला तरी या सामन्यातील बेळगावचा सुजय संजय सातेरी याची विशेष करून यष्टीरक्षक म्हणून कामगिरी वाखरण्याजोगी लक्षात ठेवण्यासारखी झाली.

रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या इलाईट ‘क’ गटातील अहमदाबाद येथे सुरू असलेल्या सामन्यात काल रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसा अखेर कर्नाटकचा संघ प्रतिस्पर्धी गुजरातवर विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करीत होता. गुजरातवर विजय मिळवण्यासाठी कर्नाटक संघाला 110 धावांची गरज होती. मात्र प्रतिस्पर्ध्यांच्या भेदक गोलंदाजी समोर कर्नाटकचा डाव 103 धावा मध्येच आटोपला. खेळपट्टी फिरली फिरकी गोलंदाजीला अनुकूल झाली आणि गुजरातच्या एकाच गोलंदाजाने सात गडी बात केल्यामुळे कर्नाटकला पराभवाला सामोरे जावे लागले, ही वस्तुस्थिती असली तरी सदर सामन्यात बेळगावचा मजगावचा सुपुत्र असलेला सुजय संजय सातेरी याचा खेळ उठावदार झाला. पहिल्यांदाच कर्नाटक रणजी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुजयने चांगली फलंदाजी करण्याबरोबरच सदर स्पर्धेत वाखण्याजोगे यष्टीरक्षण केले. त्याने यष्टी मागे घेतलेले झेल इतके अप्रतिम होते की समालोचकांनी देखील सुजयची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

सुजयचे वडील संजय सातेरी हे एकेकाळचे नामवंत पैलवान आणि रियल इस्टेट व्यवसायिक आहेत. त्याचप्रमाणे ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. यांनी गुरुकुल पद्धतीने कोल्हापूरमध्ये मोतीबाग तालमीत हिंदकेसरी गणपतराव आंंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेतले असले तरी त्यांनी आपल्या मुलांमधील क्रिकेट खेळाचे कौशल्य लक्षात घेऊन त्याला सातत्याने प्रोत्साहित केले.

टिळकवाडीतील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये असल्यापासून सुजयची क्रिकेट मधील चमक दिसून येत होती. तेंव्हा शाळेच्या क्रिकेट संघासाठी यष्टिरक्षक मिळत नव्हता त्यावेळी सुजयच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे घालून ग्लाउज वगैरे खरेदी करण्याद्वारे सुजयला यष्टिरक्षक बनविले. या पद्धतीने शाळेसाठी यष्टिरक्षक म्हणून मदतीस तयार झालेला सुजय आज कर्नाटक रणजी ट्रॉफी क्रिकेट संघातील यष्टीरक्षकाचे स्थान सांभाळत आहेत. त्यावेळी हेरवाडकर हायस्कूलमध्ये चौथीत असल्यापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणाऱ्या सुजय याला बेळगाव स्पोर्ट्स क्लबने मार्गदर्शन करत योग्य दिशा दिली. त्यावेळी सुजय मजगावहून बेळगावला ये-जा करून क्रिकेटचा सराव करत होता. शालेय संघातून उत्कृष्ट कामगिरी करणारा सुजय त्यानंतर 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा खेळत राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावचे प्रतिनिधित्व करू लागला.Sujay

प्रारंभापासूनच फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून खेळणारा सुजय हा सध्या प्रेसिडेन्सी कॉलेज बेंगलोर येथे शिकत आहे. विशेष म्हणजे क्रिकेट खेळाबरोबरच अभ्यासातही सुजय हुशार आहे. क्रिकेटमध्ये नांवलौकिक मिळवत असताना सुजयने दहावीत 90 टक्के आणि बारावीत 88 टक्के गुण संपादन केले आहेत. अल्पवयात राज्यस्तरावर चमक दाखवणाऱ्या सुजयच्या खेळाने रघुराम भट्ट सारखे नामवंत खेळाडू प्रभावीत झाले. तेंव्हापासून सुजय हा नामवंत कसोटी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या बेंगलोर येथील स्वस्तिक युनियन या क्लबतर्फे खेळत आहे. नॅशनल अकॅडमी मधून खेळत दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करणारा सुजय हा पृथ्वी शॉ, नितीन जोश, देवदत्त पडिकल, शुभांग हेगडे या सध्याच्या देशातील आघाडीच्या होतकरू क्रिकेटपटून पैकी एक आहे. एकेकाळी 16 वर्षाखालील गटात निवड झालेले हे सर्वजण एकाच बॅचचे आहेत. सुजयने 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सलग तीन वर्ष कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर आता रणजी क्रिकेट स्पर्धेत सुजय संजय सातेरी याने आपली चमक दाखवण्यास सुरुवात केली आहे.

यंदाच्या 2024 च्या रणजी हंगामातील अहमदाबाद येथील इलाईट ‘क’ गटातील गुजरात विरुद्धचा सामना कर्नाटकला गमावा लागला असला तरी या सामन्यात बेळगावच्या सुजय सातेरी याने फलंदाजी बरोबरच उत्कृष्ट यष्टीरक्षण करण्याद्वारे आपली अशी वेगळी छाप सोडली आहे, हे मात्र निश्चित.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.