बेळगाव लाईव्ह :वनवास भोगून प्रभू श्रीराम अयोध्येत आल्यानंतर आंब्याच्या पानाची तोरणं बांधून, गुढ्या उभ्या करून, रांगोळ्या काढून ज्याप्रमाणे गावभर अत्यंत उत्साही जल्लोषी वातावरण निर्माण झाले होते. त्या वातावरणाची पुनर्रअनुभूती घ्यावयाची असेल बेळगाव नगरीत आलं पाहिजे.
गल्लोगल्ली, कोपऱ्या कोपऱ्यात, शेतशिवारांमध्ये प्रत्येक ठिकाणी आज प्रभू श्रीरामचंद्रांवरील असीम भक्तीची आणि जल्लोषाची अनुभूती घेत आहे. शहरातील प्रत्येकाच्या नसानसात उत्साह सळसळत आहे. मनुष्याच्या आयुष्यात आनंदाचा क्षण कसा असतो अवघं गाव कसं आनंदमय होऊन जातं दुसरा दुखी राहू नये म्हणून प्रत्येक जण कसा धडपडतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आजचा बेळगाव शहर आहे.
अवधपुरी आयोध्या जेवढी सजली आहे, तेवढेच किंवा किंबहुना थोडी जादा बेळगाव नगरी सजली आहे. शहरातील प्रत्येकाचे मन श्री राम भक्तीने भारून गेले आहे. पाचशेहेहून अधिक वर्षाचा संघर्ष आणि प्रदीर्घ न्यायालयीन प्रतिस्पर्धेनंतर अयोध्येतील राम जन्मभूमीच्या स्थानी भव्य श्री राम मंदिर साकारले. त्याचे एक तेज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. माणसांच्या समूहाचा जल्लोष कसा असावा त्याचं एक प्रतीक म्हणून आज बेळगाव शहराकडे पाहता येईल.
विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, जेवणावळी वगैरेंद्वारे कुठेही काही कमी पडू नये याची प्रत्येक जण काळजी घेताना दिसत आहे. अशा अनोख्या सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण पाहण्याचे भाग्य ज्यांना लाभलं ते खरे भाग्यवंत. आयोध्यातील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा म्हणजे हिंदुत्वाच्या आजवरच्या कारकिर्दीतला हा मेरूमणी म्हणावा लागेल. जोखंडातील आपल्या देवाला मुक्त करून त्याला पुनर्र प्रतिष्ठापित करावं त्याची एक प्रतिमा पुन्हा लोकांच्या मनात हृदयात कशी ठसेल? यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी जे जे करावे लागेल ते प्रत्येक राम भक्ताकडून, प्रत्येक हिंदुत्ववाद्याकडून सध्या केला जात आहे.
केवळ हिंदुत्ववादी नव्हे तर अन्य जाती धर्माचे लोक देखील यामध्ये आपला घरचा सोहळा आहे असे समजून सहभागी होत आहेत, हेही बेळगावचे एक अनोखे उदाहरण आहे. शेजारचा सुखी तर आपण सुखी हा जो मूलमंत्र आहे त्याचे हे जिवंत उदाहरण आहे.
गाव सुखी निरामय व्हावं या पद्धतीची भावना सर्वत्र पसरली आहे. मुळातच बेळगाव ही उत्सव प्रिय लोकांची नगरी आहे. त्यामुळे कोणत्याही सणासुदीला सकारात्मक प्रतिसाद देणारी बेळगावकर जनता या राष्ट्रीय उत्सवात कशी काय मागे राहील, त्यामुळे या जनतेने या उत्सवात स्वतःला झोकून दिले आहे. कुठेही कशाची कमतरता नसलेला एक सुंदर उत्सव आज बेळगाव नगरीत साजरा होत आहे. प्रति आयोध्या साकारलेली कोठे पहायची असेल तर लोकांनी बेळगावला यायला हरकत नाही. भगवे झेंडे, पताकांसह भगवेमय वातावरण, श्री रामाच्या प्रतिमा, रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटलेले रस्ते, स्वच्छ सूचिर्भूत झालेले नागरिक आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलसत असलेला आनंद असे आजचे बेळगाव शहराचे चित्र आहे.
अवघी बेळगाव नगरी रोमांचित झालेली, फुललेली, शृंगारलेली आणि आनंदलेली आहे. चला एकदा अनुभव राममय झालेल्या या बेळगावचे हे अनोखे रूप.एकूणच सोमवारचा दिवस महाप्रसाद उत्साह आणि जल्लोषाचा असणार आहे.