बेळगाव लाईव्ह : नेहरू नगर क्रॉस नंबर २ येथील महादेव मंदिराच्या मागील बाजूच्या गटारी ब्लॉक झाल्याने दुर्गंधीयुक्त दूषित पाणी रस्त्यावर येत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत होत्या.
यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात नुकतेच बेळगाव लाईव्ह ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेण्यात आली असून सदर समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
नेहरूनगर महादेव मंदिर पाठीमागील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. हे पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठी समस्या निर्माण व्हायची. गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी अनेकांच्या अंगावर उडत असल्याने नागरीकातून संताप व्यक्त करण्यात येत होता.
गटारी स्वच्छ न केल्याने रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्ताही खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या ठिकाणी रस्ता खोदाई करून मोठी पाईप घालावी व येथील पाणी जाण्यास निचरा करून द्यावा आणि याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महानगरपालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.
यासंदर्भात समाजसेवकांनी बेळगाव लाईव्हकडे सविस्तर वृत्त देऊन यावर प्रकाशझोत टाकण्याची विनंती केली होती. यानुसार बेळगाव लाईव्ह वर या वृत्ताचे सविस्तर वार्तांकन करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेने येथील गटारीच्या स्वच्छतेचे कामकाज सुरु केले आहे. याबाबत येथील स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.