बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्रास देत त्यांच्यावर अन्याय करत असल्यामुळे सरकारला सर्वप्रथम हिंदू विरोधी धोरण तात्काळ मागे घेण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी श्रीराम सेना बेळगावने राज्यपालांकडे केली आहे. त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार त्वरीत न थांबल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे.
श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वप्रथम राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकारचा धिक्कार असो, हिंदू विरोधी काँग्रेस सरकारचा धिक्कार असो, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देऊन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. निदर्शने करण्यात आल्यानंतर मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सत्तेवर आल्यानंतर राज्य सरकारने गेल्या 5 महिन्यात हिंदू कार्यकर्त्यांवर खोटे खटले दाखल करण्याचे सत्र सुरू केले आहे. पोलीस प्रशासनाला हाताशी धरून राजकारण केले जात आहे याची काही उदाहरणे द्यायची झाल्यास दोड्डबेळ्ळापूर येथे बेकायदेशीर 35 टन गोमांस पकडणाऱ्या श्रीराम सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेशगौडा आणि बेंगलोर महानगर कार्यदर्शींसह 15 गोरक्षकांना 48 दिवस कारागृहात डांबण्यात आले. श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना शिमोगा, चिक्कमंगळूर जिल्ह्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. चिक्कमंगळूर श्रीराम सेनेचे राज्य कार्यदर्शी राजू खानप्पण्णावर, विभाग अध्यक्ष रणजीत शेट्टी आणि जिल्हाध्यक्ष ग्यानेंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. मंगळूर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना तडीपार करण्यात आले आहे. बेंगलोर मधील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुंडा ॲक्ट लावण्यात आला आहे. तसेच गुलबर्गा येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा रावडी शीटमध्ये समावेश करण्यात आला आहे. हुबळीमध्ये अयोध्या कारसेवकांना अटक करून त्यांचाही रावडी शीटमध्ये समावेश करण्यात आला आहे. या पद्धतीने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. तेंव्हा सरकारला सर्वप्रथम हिंदू विरोधी धोरण तात्काळ मागे घेण्याचा आदेश द्यावा, असा तपशील निवेदनात नमूद आहे. तसेच हिंदू कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार त्वरित न थांबल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन सादर करण्यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी राज्य सरकारकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जाणून बुजून लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे, खटले दाखल केले जात आहेत. बेकायदेशीर गोमांस वाहतूक, लव जिहाद यासारखे गैरप्रकार थांबवणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. कारसेवकांवर 30 वर्षांपूर्वीची केस ओपन करून त्यांना अटक करण्यात येत आहे या सर्व प्रकारांचा आमची श्रीराम सेना संघटना तीव्र निषेध करते तसेच आज निवेदन सादर करण्यात आले कर्नाटक सरकारला इशारा देत आहे, आव्हान देत आहे की हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा, त्यांच्यावर खोटे खटले दाखल करण्याचा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा असे सांगून अन्यथा आम्ही ‘काँग्रेस हटावो, कर्नाटक बचावो’ असे मोठे राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मुतालिक यांनी दिला.