बेळगाव लाईव्ह :अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन व श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरातील मोतीलाल चौक येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टी आणि शहरातील 10 प्रमुख गल्ल्यांच्यावतीने येत्या सोमवार दि. 22 जानेवारी 2024 रोजी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी आज शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना उपरोक्त माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पांगुळ गल्ली, भेंडी बाजार, टेंगीनकेरी गल्ली, कसाई गल्ली, माळी गल्ली मणसे गल्ली, आझाद गल्ली, कामत गल्ली, भातकांडे गल्ली वगैरे श्री सिद्धिविनायक मंदिर, मोतीलाल चौक परिसरातील 10 गल्ल्यांच्या सहकार्याने येत्या सोमवारी 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपूर्ण देशात हा राष्ट्रीय उत्सव म्हणून सर्वांनी साजरा केला पाहिजे. कारण गेल्या 500 वर्षांपूर्वीचा इतिहास लक्षात घेता या 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज देशातील हिंदू समाज प्रभू श्रीराम आपल्या मूळ स्थानी विराजमान होतानाचा साक्षीदार बनत आहे. त्या 500 वर्षात लाखो हिंदूंनी आपल्या प्राणाची आहुती दिली. कित्येक लढाया, संघर्षानंतर श्रीराम आपल्या मूळ स्थानी विराजमान होत असल्याचा सुवर्णक्षण आपल्याला पाहता येणार आहे.
यापेक्षा मोठा सौभाग्य कोणतेही नाही. त्यामुळे अयोध्येतील सोहळा आपण बेळगाव शहरात दिवाळी सणाप्रमाणे साजरा केला पाहिजे. त्यासाठीच आम्ही श्री सिद्धिविनायक ट्रस्टी मोतीलाल चौकच्या पुढाकाराने तसेच आसपासच्या गल्ल्यांच्या सहकार्याने येत्या 22 जानेवारी रोजी महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तरी समस्त हिंदू बांधवांसह इतर धर्मीय बांधवांनी देखील मोतीलाल चौक येथील या महाआरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी केले आहे.