बेळगाव लाईव्ह :दरवर्षी लाखो लोक भेट देणाऱ्या सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि यल्लम्मा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे परिवहन आणि धर्मादाय मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले.
मंत्री रामलिंगारेड्डी यांनी सौंदत्ती यल्लम्मा मंदिराला सोमवारी (ता. ८) भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यल्लम्मा मंदिर हे उत्तर कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे आणि लाखो लोक भेट देतात. लाखो लोकांना सुरळीत दर्शन घेता यावे, तसेच यात्रा काळात पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
चार-चार तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, सावली, स्वच्छतागृह आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
याशिवाय मंत्री रामलिंगारेड्डी म्हणाले की, धर्मादाय व पर्यटन विभागाच्या वतीने विकासकामे करण्याचा मानस असून सरकारकडून आणखी निधीही मंजूर केला जाऊ शकतो. उपलब्ध असलेल्या ८७ एकर जागेत पुढील दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करता येईल, असा सर्वंकष आराखडा तयार करण्यात येणार आहे. मंदिराला वर्षाला अंदाजे २० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. या उत्पन्नातून मंदिराच्या देखभालीनंतर उरलेले पैसे मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी वापरता येतील.
तत्पूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक यात सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांनी, ‘यल्लम्मा देवी मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकच गेट उघडण्यात आले आहे. मात्र, डोंगरावर येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने चारही दरवाजे उघडून सोय करावी. भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिराच्या दोन्ही बाजूला फूटब्रिज बांधण्यात यावा.
भाविकांच्या संख्येनुसार अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना केली. या बैठकीला धर्मादाय खात्याचे आयुक्त बसवराजेंद्र, यल्लम्मा मंदिराचे कार्यकारी अधिकारी एसपीबी महेश, सार्वजनिक बांधकाम विभाग, निर्मिती केंद्र आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.