बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह :अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगावच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणांसह सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज बुधवारी सकाळी शहरातील हुतात्मा चौकात गांभीर्याने पार पडला. यावेळी मूकफेरी काढून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज बुधवारी सकाळी हुतात्मा चौक येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि नेत्यांसह आजी-माजी मराठी भाषिक लोकप्रतिनिधींनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे दोन मिनिटे मौन पाळून सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण -पाटील, मदन बामणे, ॲड. अमर येळ्ळूरकर, माजी महापौर सरिता पाटील, उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, नेताजी जाधव आदींसह बहुसंख्य मराठी भाषिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमादरम्यान अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे या घोषणेसह सीमाप्रश्नी घोषणा देण्यात येत होत्या.
यावेळी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी 17 जानेवारी 1956, 1 नोव्हेंबर 1958 आणि 1 जून 1986 च्या सीमाआंदोलनातील हुतात्मे आणि मुंबई येथे शिवसेनेने सीमाप्रश्नी छेडलेल्या आंदोलनातील 67 शिवसैनिक हुतात्म्यांना आज समस्त बेळगावकरांच्यावतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आल्याचे सांगितले.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानण्याबरोबरच फक्त अभिवादन करून चालणार नाही तर हुतात्म्यानी ज्या प्रश्नासाठी आपले बलिदान दिले आहे तो प्रश्न सोडवून घेण्यासाठी आपली जबाबदारी काय आहे? हे समजून घेऊन मराठी भाषिकांनी अत्यंत एकजुटीने कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक मराठी माणसाने आपली भाषा, संस्कृती आणि आपली मराठी लिपी याचे संरक्षण घेण्याचे व्रत घेतले पाहिजे. यासाठी विशेष करून युवा पिढीने पुढाकार घेऊन आपला हा लढा पुढे नेणे आवश्यक आहे असे सांगून अष्टेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या दाव्याची थोडक्यात माहिती दिली. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळातील कर्नाटक सरकारची मराठी भाषिकांच्या बाबतीतील दडपशाही लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने फक्त दावा दाखल करून स्वस्थ न बसता कणखर भूमिका घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
ज्यांना कन्नड भाषा वाढवायची आहे त्यांनी ती जरूर वाढवावी, परंतु ते करताना बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषा पुसण्याचा प्रयत्न करू नये. हा प्रकार आम्ही मराठी भाषिक कधीही खपवून घेणार नाही. ही बाब आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. पोलिसांना देखील त्यांच्या संरक्षणात कशाप्रकारे मराठी भाषिकांना डिवचले जाते याची माहिती देण्यात आली आहे. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देईलच मात्र तोपर्यंत आपण आपली भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करणे गरजेचे आहे. कोणाचे तरी ऐकून प्रशासनाने देखील एका मोठ्या समुदायावर अन्याय करू नये अन्यथा त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले तर त्याची जबाबदारी सर्वस्वी येथील सरकार व प्रशासनाची असेल. बेळगावच्या सर्वसामान्य मराठी भाषिकांसह व्यापारी व उद्योजकांनी लक्षात ठेवले पाहिजे की आपण या ठिकाणी जन्माला येऊन लहानाचे मोठे झालो आहोत.
त्यामुळे बाहेरून या ठिकाणी वास्तव्यास आलेले लोक आम्हा स्थानिकांविरुद्ध काही करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते त्यांना त्रिवार शक्य होणार नाही. व्यापारी बंधूंनी त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आमच्यावर अन्याय होत आहे असे म्हणत बसण्याऐवजी याविरुद्ध तक्रार करण्याची तयारी ठेवावी. एकंदर हुतात्म्याने दिलेले आपले बलिदान जर वाया जाऊ द्यायचे नसेल तर सर्व मराठी भाषिक आणि एकजुटीने कार्यरत राहावं, असे आवाहन शेवटी मालोजीराव अष्टेकर यांनी केले.
हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर फेरीला सुरवात झाली. हुतात्मा चौकातून रामदेव गल्ली येथून संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार मार्गे गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, रामलींग खिंड गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे हुतात्मा चौकात मुकफेरीची सांगता झाली. या मुकफेरी दरम्यान मधु बांदेकर सारखे हुतात्मे ज्या ठिकाणी शहीद झाले त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व नेतेमंडळींसह समिती कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांचा मोठा सहभाग असणारी ही मुकफेरी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या आजचा कार्यक्रम आणि मुकफेरी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.