बेळगाव लाईव्ह :प्रशांत बर्डे सर. रविवारी संक्रांतीच्या आदल्यादिवशी गेले. अन्यथा दरवर्षी जसा त्यांचा यायचा तसा यंदाही फोन आला असता… काय म्हणता, काय चाललय….. काय ते…..अशा आपल्या शैलीत बोलत बोलत…. वेळ असेल तर येऊन जा म्हणत…. राहूदे घ्या, पण संक्रांतीच्या शुभेच्छा फोनवरून घ्या…. असे सांगत आमची चर्चा रंगली असती. पण यंदा सरांनी एक्झीट घेतली आणि त्यांच्या आठवणीत, त्यांच्या जाण्याच्या दुःखात यंदाचा संक्रांतीचा सण खऱ्या अर्थाने सण म्हणून साजरा झालाच नाही. सर गेले म्हणजे आपल्या प्रदीर्घ अशा १८ वर्षीय दुखण्यातून एकदाचे सुटले, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तरीही त्यांचे असणे आणि आता त्यांचे नसणे यातील फरक लक्षात घेतला तर झालेले नुकसान कधीही भरून येणारं नाही.
बर्डे सर आणि माझा संबंध आमच्या रमेश हिरेमठ सरांमुळे. ते त्यांचे गुरू. तसे म्हणाल तर वडिलच. त्यांच्या तोंडून बर्डे सरांच्या एकंदर कार्याची प्रचिती आलीच होती. आमच्या पत्रकारितेची सुरुवात झाली तो काळ वेगळाच होता. आपल्या क्षेत्रात आपल्या पूर्वी कुणी काय काय केलं आहे याची दखल घेण्याचे संस्कार आमच्यावर सुरुवातीलाच झालेले. यामुळे दैनिक पुढारी मध्ये असलेल्या बर्डे सरांच्या एकंदर वाटचालीवर लक्ष देऊन माहिती घेतली होती. सर म्हणजे एक दरारा. पत्रकार परिषदेत भल्या मोठ्या नेत्यांना पाणी पाजणारे, लेखातून अनेकांना घाम फोडणारे, अभ्यासू लेखनाच्या जोरावर अनेकांना परिपूर्ण माहिती देणारे आणि आमच्या सारख्या चिल्ल्या पिल्ल्यांना मायेने बोलावून घेऊन मार्गदर्शन करणारे… भले भले प्रशासकीय अधिकारी बदली होऊन गेले तरी सतत त्यांच्याशी फोनवर बोलताना आम्ही ऐकले आहेत. बेळगावला आले की बर्डे जी को मिलना है म्हणत त्यांच्या घरी आवर्जून येताना आम्ही पाहिले आहेत.
गोव्यात ज्येष्ठ आय ए एस अधिकारी अतुलकुमार तिवारी इफ्फी मध्ये भेटले होते. मी बेळगावचा असे कळल्यावर त्यांनी बोललेले उद्गार मला आजही आठवतात. अरे बर्डे जी कैसे है? वापिस जाओगे तो बोलना, मैने उन्हे याद किया……
बर्डे सरांचा संबंध अधिक दृढ झाला तो पत्रकार विकास ट्रस्ट मुळे. ट्रस्टचे तीन प्रमुख विश्वस्त…. पहिले बर्डे सर, दुसरे तरुण भारत चे संपादक जयवंत मंत्री सर आणि तिसरे नेताजी जाधव. या तिघांनी निर्णय घेतला, मला ट्रस्ट चा सेक्रेटरी बनविण्याचा…. ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही असंख्य उपक्रम राबविले. अहो आम्ही बातम्या दिल्या, पेपर छापले आणि ते कुणी विकले नाही तर? पेपर विक्रेते फार महत्त्वाचे हो…. त्यांना पहिल्यांदा सायकली देऊया…..अशा शब्दात त्यांची सुरुवात. एक कार्यक्रम ठरवून पूर्ण होई तोवर स्वतः झोपायचे नाहीत आणि आम्हालाही झोपू द्यायचे नाहीत. पुढे माझ्यासारख्या लहान माणसाला त्यांनी ट्रस्टचे (आत्ताचे प्रतिष्ठान) अध्यक्ष केले. कोरोनाच्या काळात जास्त कार्यक्रम करता आले नाहीत याचे दुःख त्यांना सतत वाटायचे… तरीही अहो आमचे लोक फार गरीब आहेत हो, त्यांना गुपचूप मदत देऊया म्हणत स्वतःच्या घरातून मदतीच्या किट वाटायची जबाबदारी त्यांनी घेतली. कधीकधी त्यांच्या वागण्याची आम्हाला किट किट वाटायची. मात्र ते कधी हरायचे नाहीत. संस्थेचे जे उद्दिष्ठ आहे ते पूर्ण करण्यासाठी झटत राहायचे.
एका आजाराने त्यांना घरी बसवले. पण हातातला फोन आणि सतत फिरत राहणारे मन यातून त्यांचा स्वैर संचार कधीच थांबला नाही. बर्डे सरांचा फोन आला की अनेकांना घाम यायचा. काय ऐकतोय ते खरे आहे? असे विचारत चांगले असेल तर कौतुक आणि वाईट असेल तर समाचार घेत ते सगळे ठीक करण्यात पटाईत होते. कुठल्या संस्थेत जर काहीतरी कुरबुर सुरू असल्याचे त्यांनी ऐकले तर कुरबुरी मंडळींना सरळ घरी बोलावून, हे बघा, हे मला काय पटलेलं नाही. हे थांबवा असे सरळ शब्दात सांगण्याची ताकत त्यांच्यात होती. जुन्या प्रसिद्ध गोपाळ गणेश मंडळाच्या मुशीत ते तयार झालेले. आम्हाला अनेकदा त्या जुन्या गोष्टी सांगायचे.
बेळगावचा कोण माणूस कसा वर आलाय आणि कुणी काय काय केलेय याची अलिखित कुंडलीच त्यांच्याकडे होती. कुणी जर कुणाला त्रास केला आणि त्रास झालेली व्यक्ती बर्डे सरांकडे गेली तर सर सर्व बाजू ऐकून घेऊन त्या संबंधिताला फोन लावायचे. एका इशाऱ्यावर भले भले ठीक व्ह्यायचे. सरांनी दिलेला चहा पिऊन तो माणूस सुटकेचा निःश्वास घेऊन निघून जायचा.
बेळगावात पुढारी हे दैनिक रुजविण्यात त्यांचा आणि फक्त त्यांचाच वाटा आहे. पुढारी हा पेपर सर्वसामान्य लोकांच्यात रुजविण्यात त्यांचे प्रचंड मोठे योगदान आहे. बर्डे सर म्हणजे पुढारी हे समीकरण आजही टिकून आहे. अनेक मोठ्या प्रकरणात आपल्या लेखन शैली आणि निर्भिड पत्रकारितेच्या जोरावर त्यांनी केलेले काम बेळगावच्या इतिहासात कायम आठवणीत राहणार आहे. बर्डे सर आम्हा सर्व भाषिक पत्रकारांचे नेहमीच मार्गदर्शक होते. अहो सकाळी पेपर वाचत नाही तर काय डोंबल लिहिणार तुम्ही? वाचा हो…. असे ते सांगायचे. एकाध्या विषयाची माहिती देताना ते थकायचे नाहीत. स्वतःचा फोटो, स्वतःचे कौतुक याचे त्यांना कधीच कौतुक नव्हते. यामुळे अनेक कार्यक्रमात ते मागे राहायचे पण पाठीमागून जसे हवे तसेच झाले पाहिजे हा त्यांचा हट्ट असायचा. म ए समितीचे राजकारण, निवडणुका आणि इतर गोष्टीत जर कुणी काही चुकीचे करत असल्याचे जाणवले की त्यांचा संताप अनावर व्हायचा. बर्डे सरांना भडकलेले ज्यांनी पाहिले आहे त्यांना याची कल्पना आहे.
वर्तमान पत्रे जगली पाहिजेत हा त्यांचा आग्रह. पण बदलत्या स्थितीत जेंव्हा डिजिटल पत्रकारिता रुजू लागली तेंव्हा त्यांनी आपले विचार कायम ठेऊन नवीन जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. प्रकाश बेळगोजी हे याबद्दल साक्षीदार म्हणता येतील. त्यांच्या बेळगाव लाईव्ह ची स्थापना झाली ती मुळात बर्डे सरांच्या घरी. सुरुवातीला बर्डे सर स्वतः बेळगाव लाईव्ह साठी वार्तापत्र लिहायचे. डिजिटल असो नाहीतर कायपण हो, पण वाचनीय करा हो… असे सांगायचे…. पटले नाही तर ओरडायचे आणि चांगले वाटले की मनापासून कौतुकही करायचे. पत्रकारितेच्या नावाखाली कुठे काही गैर सुरू असल्याचे कानावर आले की त्यांना राग यायचा. अनेक पत्रकारांना त्यांनी घडवले आहे. अनेकांच्या चुका पाठीशी घालून घेऊन पुन्हा पुन्हा सुधारण्याची संधी त्यांनी दिली आहे. अशावेळी काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ असे म्हणत त्यांनी अनेकांना सांभाळून घेऊन जगण्याचा मार्ग मिळवून दिला आहे.
कधी बोलावेसे वाटले की ते मला फोन करत. कामात आहे? नसला तर जरा येता काय? असे म्हणत. एकाकी जीवनाबद्दल जास्त न बोलता मनातली खंत बाजूला ठेऊन त्यांनी अनेक जणांना आधार दिला आहे. बेळगावच्या मातीत तयार झालेला पैलवान अतुल शिरोळे, मुलांना स्विमिंग शिकवताना स्वतः जलतरण पटू झालेल्या ज्योती होसट्टी यांच्यासारख्या मंडळींचे त्यांना भारी कौतुक. अपंगांना विदेशात नेऊन हिरो बनवणारे उमेश कलघटगी, शांताईच्या माध्यमातून काम करणारे माजी महापौर विजय मोरे, साध्या पत्रकाराचे संपादक बनलेले कुंतीनाथ कलमनी यांचा त्यांना फार अभिमान. ते नेहमीच कष्ट करणाऱ्याच्या बाजूने असायचे.
सर नाहीत. पण त्यांची शिकवण कायम राहील. त्यांनी घडवलेले असंख्य पत्रकार कायम राहतील. त्यांच्या आठवणी चिरकाल टिकून राहतील. त्यांचे नसणे सतत अस्वस्थ करून जाईल. शास्त्रीय संगीताची चांगली जाण आणि आवड असणारे बर्डे सर दत्तगुरु दत्तात्रेय भक्त. स्वामी समर्थांचे अनुयायी. एक गुरूमार्गी गुरू माणूस. भक्ती आणि वास्तव यांची सांगड घालत जगलेले व्यक्तिमत्त्व. बेळगाव हा विषय आला, येथील सामाजिक आणि राजकीय संदर्भ आले, पत्रकारिता आली की बर्डे सरांचे नाव लक्षात येईल…. आणि माझ्यासारखीच अनेकांची हुरहूर दाटून येईल. यात शंका नाही….. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली….. आदरांजली……-
प्रसाद सु. प्रभू( जेष्ठ पत्रकार बेळगाव)