बेळगाव लाईव्ह :शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरात तातडीने उड्डाणपूलाची (फ्लायओव्हर) उभारणी करणे गरजेचे आहे, असे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी स्पष्ट केले आहे.
बेळगाव शहरात उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये मंगळवारी आयोजित विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत आमदार सेठ अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. राष्ट्रीय महामार्गापासून राणी कित्तूर चन्नम्मा सर्कलपर्यंत 4.50 कि.मी. अंतराचा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून यामध्ये प्रमुख चौक ठिकाणच्या संपर्क रस्त्यांचा समावेश असणार आहे.
त्या अनुषंगाने योग्य कृती आराखडा तयार करण्यात यावा. आगामी काळात शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने उड्डाणपुलाची योजना सुनिश्चित करणे गरजेचे आहे. संकेश्वर कडून येणारी वाहने उड्डाणपूल मार्गे नव्हे तर सध्याच्या सर्व्हिस रोड वरून देखील शहरात यावीत या दृष्टीने योजना तयार केली जावी. अवजड वाहने पादचारी आदींचे अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी योजना तयार करण्याची सूचनाही आमदार असिफ सेठ यांनी बैठकीत केली.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उड्डाणपूल निर्मिती संदर्भात यापूर्वी तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती दिली. तसेच उड्डाण पुलाची योजना यशस्वी करण्यासाठी सर्व खात्याने सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीस महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अधिकारी एस. एस. सोबरद आदी उपस्थित होते.